कुलकर्णीची भाजपातून हकालपट्टी नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:33 IST2019-01-18T00:33:38+5:302019-01-18T00:33:44+5:30
डोंबिवलीतील भाजपाचे सर्वेसर्वा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे यासंदर्भात विचारणा करण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही.

कुलकर्णीची भाजपातून हकालपट्टी नाहीच
डोंबिवली : डोंबिवलीतील भाजपा शहर उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी याच्या दुकानात शस्त्रास्त्रे मिळाल्याने त्याला गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. या घटनेला ४८ तास उलटून गेले, तरी भाजपाने त्याची पक्षातून हकालपट्टी केलेली नाही. उलट, भाजपाने चक्क सोयीस्कर मौन धारण केले आहे.
डोंबिवलीतील भाजपाचे सर्वेसर्वा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे यासंदर्भात विचारणा करण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या खासगी सचिवाकडेही विचारणा केली असता, राज्यमंत्री एका महत्त्वाच्या बैठकीत व्यस्त असल्याचे सांगितले गेले. बैठक संपल्यावर ते बोलतील, असे सांगून वेळ मारून नेण्यात आली. भाजपा डोंबिवली शहराध्यक्षांनीही यावर भाष्य करणे टाळले.
भाजपाचे प्रदेश चिटणीस कल्याणचे आ. नरेंद्र पवार यांनी सांगितले की, पोलिसांची चौकशी सुरू आहे. चौकशीअंती काय उघड होते, ते पाहून त्यानंतर कुलकर्णीविरोधात पक्षाकडून कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाईल.
मनसेची सीबीआय चौकशीची मागणी
मनसेचे गटनेते मंदार हळबे यांंनी मात्र रा.स्व. संघाची चक्क पाठराखण केली. ते म्हणाले की, कुलकर्णी याच्या प्रकरणात भाजपातील काही मंडळींकडूनच गलिच्छ राजकारण केले जात आहे. कुलकर्णी प्रकरणात पोलिसांवर राजकीय व्यक्तींचा दबाव असल्याने या प्रकरणात निष्पक्ष चौकशी होण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सीबीआय चौकशी करावी.
‘भाजपाने कुलकर्णी याची हकालपट्टी करावी’
मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम म्हणाले की, मनसेच्या कार्यकर्त्याकडून असे कृत्य झाले असते, तर त्याची पक्षाने लागलीच हकालपट्टी केली असती. मात्र, भाजपाने अद्याप कुलकर्णीची हकालपट्टी केली नाही़