कोपरी पोालिसांच्या धडक कारवाईत ४४ किलो गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 22:50 IST2021-03-05T22:43:45+5:302021-03-05T22:50:32+5:30

कोपरी भागातून सहा बॅगांमधून गांजाची तस्करी करणाऱ्या संशयितांना कोपरी पोलिसांनी हटकल्यानंतर नऊ लाख ५७ हजार २८० रुपयांचा ४४ किलो ३६४ ग्रॅम वजनाचा गांजा बुधवारी जप्त केला. पोलिसांनी या दोघांचा पाठलाग केला, मात्र अंधाराचा फायदा घेत ते तिथून पसार झाले.

Kopari police seize 44 kg of cannabis | कोपरी पोालिसांच्या धडक कारवाईत ४४ किलो गांजा जप्त

रिक्षातून हस्तगत केला ९ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल

ठळक मुद्दे रिक्षातून हस्तगत केला ९ लाख ७५ हजारांचा मुद्देमालआरोपींची पोलिसांच्या हातावर तुरी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोपरी भागातून सहा बॅगांमधून गांजाची तस्करी करणाऱ्या संशयितांना कोपरी पोलिसांनी हटकल्यानंतर नऊ लाख ५७ हजार २८० रुपयांचा ४४ किलो ३६४ ग्रॅम वजनाचा गांजा बुधवारी जप्त केला. या धुमश्चक्रीत अंधाराचा फायदा घेऊन या दोघांनी मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तिथून पलायन केले. या दोघांचाही शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोपरीतील शास्त्रीनगर टीएमटी बस थांब्यासमोरील सार्वजनिक रस्त्यावर ३ मार्च २०२१ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास सहा बॅगा दोघेजण संशयास्पदरित्या घेऊन जात असल्याचे गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद साळवी तसेच पोलीस व्हॅनचे चालक शेडगे आणि अंमलदार लोंढे यांना आढळले. हे दोघेही एका रिक्षामध्ये या बॅगा ठेवण्याच्या तयारीत होते. त्याच वेळी साळवी यांच्या पथकाने त्यांना हटकले. या बॅगांमध्ये तांदूळ आणि कपडे असल्याची बतावणी त्यांनी केली. याची पडताळणी करण्यासाठी साळवी यांच्या पथकाने त्यांना बॅगा उघडण्यास सांगितले. त्याचवेळी या दोघांनी तिथून पळ काढला. पोलिसांनी या दोघांचा पाठलाग केला, मात्र अंधाराचा फायदा घेत ते तिथून पसार झाले. या बॅगांपैकी एका बॅगेत दोन किलो ७४ हजार ४८० रुपयांचा १३ किलो ७२४ ग्रॅम वजनाचा गांजा मिळाला. तर दुसºया बॅगेत आठ किलो ६०८ ग्रॅम इतका गांजा चार गठठयांमध्ये मिळाला. अन्य एका बॅगेतून एक लाख ७० हजार १२० रुपयांचा गांजा मिळाला. अशा सहा बॅगांमधून नऊ लाख ५७ हजार २८० रुपयांचा ४४ किलो ३६४ ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसुझा यांनी दिली. पसार झालेल्या दोन्ही आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Kopari police seize 44 kg of cannabis