कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक, कलानीकडून महाविकास आघाडीचा प्रचार
By सदानंद नाईक | Updated: June 21, 2024 15:26 IST2024-06-21T15:25:27+5:302024-06-21T15:26:45+5:30
कलानी कुटुंबाच्या या बदलत्या भूमिकेला शहरवासीय कसे पाठिंबा देतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक, कलानीकडून महाविकास आघाडीचा प्रचार
उल्हासनगर : लोकसभा निवडणुकीत महायुतीचे श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारात झोकून देणारे कलानी कुटुंब कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे रमेश किर यांचा प्रचार करीत आहेत. कलानी कुटुंबाच्या या बदलत्या भूमिकेला शहरवासीय कसे पाठिंबा देतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उल्हासनगरातील राजकारणात माजी आमदार पप्पु कलानी यांची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे. पप्पु कलानी हे कट्टर शरद पवार यांचे कट्टर समर्थक असून त्यांच्या सुनबाई पंचम कलानी शहरजिल्हाध्यक्ष आहेत. तर ओमी कलानी हे ओमी कलानी टीम या स्थानिक संघटने अंतर्गत राजकारण करीत आहेत. लोकसभेला कलानी कुटुंबानी थेट महाविकास आघाडीच्या श्रीकांत शिंदे यांना पाठींबा देऊन प्रचार केला. याप्रचारावर महाविकास आघाडीतील नेते व शरद पवार गटाच्या नेत्यांनी आक्षेप घेतला नाही.
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कलानी कुटुंबानी आपली भूमिका बदलून महाविकास आघाडीच्या रमेश किर यांच्या प्रचारात उतरले आहेत. कलानी यांच्या या बदलत्या भूमिकेमुळे चर्चेला उधाण आले असून विधानसभा निवडणुकीत त्यांना या बदलत्या भूमिकेचा कितपत फायदा होतो? याबाबत आराखडे बांधले जात आहे.
भाजप मुक्त शहर अशी भूमिका कलानी कुटुंबाची असल्याची माहिती कलानी कुटुंबाचे कट्टर समर्थक कमलेश निकम हे आपल्या भाषणात करीत आहेत. ओमी कलानी स्वतंत्रपणे विधानसभा निवडणुक लढविणार असल्याचेही सांगितले जाते.
लोकसभेची परतफेड म्हणून श्रीकांत शिंदे व महाविकास आघाडीने कलानी यांना पाठिंबा दिल्यास, भाजपचे आमदार कुमार आयलानी यांच्या पुढे धर्मसंकट उभे ठाकणार आहे. मात्र कलानी कुटुंबाच्या बदलत्या भूमिकेला शहरवासीय किती प्रतिसाद देतात, हे काळच ठरविणार आहे. प्रत्यक्षात नागरिकांनी कलानी यांच्या या कोलांट्या उड्या आवडलेल्या नाहीत. अश्याच प्रतिक्रिया आहेत.