किसननगरमध्ये बंद!

By Admin | Updated: October 13, 2016 03:57 IST2016-10-13T03:57:04+5:302016-10-13T03:57:04+5:30

युवा सेनेचा सक्रीय कार्यकर्ता असलेल्या तरूणाने किसननगरमधील साडेचार वर्षांच्या मुलीवरील लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेचे बुधवारी तीव्र पडसाद

Kisannagar closed! | किसननगरमध्ये बंद!

किसननगरमध्ये बंद!

ठाणे : युवा सेनेचा सक्रीय कार्यकर्ता असलेल्या तरूणाने किसननगरमधील साडेचार वर्षांच्या मुलीवरील लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेचे बुधवारी तीव्र पडसाद उमटले. त्या परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. ठाण्याचे पालकमंत्री आणि स्थानिक आमदार एकनाथ शिंदे केलेले आवाहन धुडकावून व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत आरोपीला फाशीची शिक्षा करण्याची मागणी लावून धरली. भाजप, मनसे आणि काँग्रेसनेही श्रीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन शिवसेना आणि पालकमंत्र्यांना कोंडीत पकडले.
शिवाजी प्रसाद धाडवे (२४) याने दारुच्या नशेतच किसननगरच्या पाईपलाईनजवळील मुलीचे अपहरण करुन तिला स्वत:च्या घरी नेले. तेथे पोटमाळयावर तिच्याशी कुकर्म केले. ही घटना तिच्या आईला समजताच तिने नातलगांसह श्रीनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनीही त्याला तातडीने अटक केली. तो युवा सेनेचा पदाधिकारी असल्याची माहिती किसननगर भागात वाऱ्यासारखी पसरली आणि कोणत्याही दबावाखाली न येता त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारा जमाव पोलीस ठाण्यावर गेला. दुसऱ्या दिवशी बुधवारीही त्याचे जोरदार पडसाद उमटले. भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष अ‍ॅड. माधवी नाईक तसेच ठाणे शहर शाखेचे अध्यक्ष संदीप लेले यांच्या नेतृत्वाखाली श्रीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा नेण्यात आला. भाजपपाठोपाठ मनसेचेही शिष्टमंडळ पोलीस ठाण्यावर धडकले. काँग्रेसनेही निषेध नोंदवत पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. दरम्यान, नराधमाला कडक शासन झाले पाहिजे, त्याच्यावरील खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, अशी मागणी याच परिसरातील शेकडो महिलांनी केली. तसे निवेदन महिलांच्या स्वाक्षरीसह श्रीनगर पोलिसांना देण्यात आले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आणि आरोपी शिवाजी हा युवा सेनेचा कार्यकर्ता असल्याचाही दावा केला जात असल्यामुळे किसननगर भागात दिवसभर तणावाचे वातावरण होते. त्यातच भाजप, काँग्रेस आणि मनसेने पोलीस ठाण्यावर मोर्चे काढून निषेध नोंदवित पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रकार केल्याने शिंदे हे दिवसभर किसननगरच्या शाखेतच तळ ठोकून होते. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद न करण्याबाबत त्यांनी आवाहन केले.
लहान मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजी धाडवे याला अटक झाली आहे. सोशल मीडियावर त्याची छायाचित्रे फिरत असली तरी त्याचा शिवसेना आणि युवासेनेशी कोणताही संबंध नसल्याचे पत्रक पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि युवासेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक यांनी काढले आहे. दोषी तरु णाला कठोर शिक्षा करण्याची मागणी पालकमंत्र्यांनी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे केली.
(प्रतिनिधी)

Web Title: Kisannagar closed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.