ठाण्याच्या किंगकाँगनगरमध्ये चाकूच्या धाकावर त्रिकुटाने घरात शिरुन केली लुटमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 23:59 IST2020-09-23T23:53:21+5:302020-09-23T23:59:42+5:30
किंगकाँगनगरमधील एका घरात शिरुन तिघा जणांच्या टोळक्याने चाकूच्या धाकावर २५ वर्षीय महिलेकडील दागिने आणि मोबाइल असा ५३ हजारांचा ऐवज लुबाडल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. भल्या पहाटेच्या सुमारास घडलेल्या या थरारनाटयामुळे एकच खळबळ उडाली.

सोन्याच्या दागिन्यांसह ५३ हजारांच्या ऐवज लुबाडला
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाण्याच्या किंगकाँगनगरमधील एका घरात शिरुन तिघा जणांच्या टोळक्याने चाकूच्या धाकावर २५ वर्षीय महिलेकडील दागिने आणि मोबाइल असा ५३ हजारांचा ऐवज लुबाडल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोडबंदर रोडवरील किंगकाँगनगरमधील साईबाबा मंदिराच्या मागे असलेल्या एका घरात २२ सप्टेंबर रोजी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास २० ते २५ वयोगटातील टोळके शिरले. दरवाजाला धक्का मारुन कडी तोडून त्यांनी आत शिरकाव केला. त्यावेळी तिघांपैकी एकाने घरातील २५ वर्षीय महिलेला चाकूचा धाक दाखविला. त्यानंतर दमदाटी करीत त्यांचे २० हजारांचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १२ हजारांची तीन ग्रॅम वजनाची कर्णफुले आणि प्रत्येकी दहा हजारांचे दोन आणि एक हजारांचा एक मोबाइल असा ५३ हजारांचा ऐवज जबरीने हिसकावून पलायन केले. याप्रकरणी तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
* एक आठवडयापूर्वीच एका सराफाला कोयत्याच्या धाकावर चार जणांच्या टोळीने दिवसाढवळया लुटले होते. पोलिसांनी या चौघांपैकी दोघांना अटक केली असून त्यांचे दोन्ही साथीदार मात्र अद्यापही फरार आहेत. या भागात वाढत्या लुटमारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.