अल्पवयीन मुलीचे अपहरण कापूरबावडी भागातील घटना : चार दिवसांतील दुसरी घटना
By जितेंद्र कालेकर | Updated: April 3, 2024 21:47 IST2024-04-03T21:47:07+5:302024-04-03T21:47:20+5:30
गुन्हा दाखल झाल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी बुधवारी दिली.

अल्पवयीन मुलीचे अपहरण कापूरबावडी भागातील घटना : चार दिवसांतील दुसरी घटना
ठाणे: शाळेत जाते, असे सांगून घराबाहेर पडलेली १३ वर्षीय मुलगी चितळसर मानपाडा भागातून बेपत्ता झाली आहे. तिचे अपहरण झाल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी बुधवारी दिली.
बेपत्ता मुलगी गणेशनगरमधील संकेत विद्यालयात नववीच्या वर्गात शिकते. तिची सध्या वार्षिक परीक्षा सुरू आहे. २९ मार्च रोजी तिने पहिला पेपरही दिला. ३० मार्च रोजी सकाळी ६.४५ वाजता शाळेत जाते, असे सांगून ती घराबाहेर पडली. शाळा दुपारी १२.१५ पर्यंत असल्याने दुपारपर्यंत कुटुंबीयांनी नेहमीप्रमाणे तिची वाट पाहिली. मात्र, ती घरी न परतल्याने तिची शाळेत चौकशी करण्यात आली. त्यावेळी ३० मार्च रोजी तिच्या शाळेला सुटी असल्याची बाब समोर आली. सर्वत्र शोध घेऊनही ती आढळून आली नाही.
तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त करीत पालकांनी कापूरबावडी पोलिस ठाण्यात १ एप्रिल २०२४ रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तिचा ३ एप्रिल रोजी पाचव्या दिवशीही शोध न लागल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. याआधी ठाण्यातील चरईतूनही १५ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याने पालकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.