प्रेयसी सोबत येत नाही म्हणून तिच्या मुलीचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:51 IST2021-04-30T04:51:17+5:302021-04-30T04:51:17+5:30
डोंबिवली : प्रेयसी सोबत येत नाही या रागातून तिच्या तीन वर्षीय मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपी प्रियकराला मानपाडा पोलिसांनी अवघ्या ...

प्रेयसी सोबत येत नाही म्हणून तिच्या मुलीचे अपहरण
डोंबिवली : प्रेयसी सोबत येत नाही या रागातून तिच्या तीन वर्षीय मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपी प्रियकराला मानपाडा पोलिसांनी अवघ्या सहा तासांत बेड्या ठोकल्या आहेत.
डोंबिवली पूर्व भागात राहणाऱ्या एका महिलेची दिनेश तिवारी नावाच्या व्यक्तीसोबत मैत्री होती. काही दिवस ती महिला दिनेशसोबत राहिली. मात्र, दोघांमध्ये वाद सुरू झाल्याने ती महिला पुन्हा पहिल्या पतीकडे आली. महिलेला दोन मुली आहेत. एक नऊ वर्षांची तर दुसरी तीन वर्षांची. दिनेश हा त्या महिलेकडे आला आणि तिने त्याच्यासोबत पुन्हा यावे असा हट्ट धरला. मात्र, महिलेने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. या रागातून तिच्या नकळत दिनेशने तिच्या तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण केले. मुलगी बेपत्ता होताच तिने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत महिलेचा तिच्या मित्रासोबत वाद झाल्याचे समोर आले. या एकाच धाग्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. अवघ्या सहा तासांत पोलीस अधिकारी श्रीकांत गोरे यांच्या पथकाने आरोपी दिनेशचा मोबाइल ट्रॅक करून त्याला बेड्या ठोकून त्याच्या ताब्यातील तीन वर्षीय चिमुरडीची सुटका करून तिला आईच्या स्वाधीन केले.
------------------------------------------------------