केडीएमसीचे चार वर्षांत १२५ कोटी ‘खड्ड्यांत’, रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 01:47 AM2019-08-17T01:47:51+5:302019-08-17T01:48:20+5:30

कल्याण-डोंबिवली परिसरांत अतिवृष्टीमुळे सगळ्याच रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहतूककोंडीत अधिकच भर पडत आहे.

KDMC's125 crore in 'potholes' in last four years, need for concreteization of roads | केडीएमसीचे चार वर्षांत १२५ कोटी ‘खड्ड्यांत’, रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची गरज

केडीएमसीचे चार वर्षांत १२५ कोटी ‘खड्ड्यांत’, रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची गरज

googlenewsNext

कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरांत अतिवृष्टीमुळे सगळ्याच रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहतूककोंडीत अधिकच भर पडत आहे. मागील चार वर्षांत खड्डे बुजवण्यावर महापालिकेने किमान १२५ कोटी रुपये खर्च केले आहेत. तरीही, रस्त्यांवर खड्डे कायम आहेत. त्यामुळे हा निधी वाया गेल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.

महापालिकेतील मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी सांगितले की, महापालिकेची निवडणूक २०१५ मध्ये झाली. त्यानंतर, चार वर्षांत महापालिकेच्या अर्थसंकल्पात खड्डे बुजवण्यासाठी केलेल्या आर्थिक तरतुदींवर नजर टाकल्यास १२५ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

तरीही, रस्त्यांची अवस्था बिकट आहे. यंदाच्या वर्षी जोरदार पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडलेले असून, रस्ते वाहून गेल्याचे पाहायला मिळत आहे. महापालिका खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करते. या निधीतून वर्षभरात खड्डे बुजवण्याचे काम केले जाते. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च करूनही खड्डे योग्य प्रकारे बुजवले जात नाहीत. खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट होत असल्याने ते टिकत नाही. एखादा रस्ता तयार केल्यावर त्याची देखभाल दुरुस्ती व त्यावर खड्डा पडणार नाही, यासाठी कंत्राटदाराकडून तीन वर्षे हमीपत्र घेतले पाहिजे. चार वर्षांपूर्वी महापालिकेने तशी तजवीज केली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या, अशी स्थिती उद्भवली आहे.

मागच्या वर्षी कल्याण शहरात खड्ड्यांमुळे पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनांनंतर महापालिकेने १३ कोटी रुपये खड्डे बुजवण्यासाठी तातडीने मंजूर केले होते. मागच्या वर्षी मुंबई-गोवा मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी ३० कोटींची तरतूद सरकारने केली होती. मात्र, महापालिकेने महापालिका हद्दीतील खड्डे बुजविण्यासाठी १३ कोटींची तरतूद केल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले. २००९ मध्ये महापालिकेस महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत काँक्रिटीकरणाचे रस्ते तयार करण्यासाठी ४०१ कोटी रुपये दोन टप्प्यांत मंजूर केले होते. त्यानंतर, महापालिकेने महापालिकेच्या निधीतून ४३ रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम घेतले. त्यानंतर, आजही बहुतांश रस्ते हे डांबरी आहेत. त्या रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतल्यास खड्डे बुजवण्यावर होणारा खर्च कमी होऊ शकतो. खड्डे पडू नयेत, यासाठी महापालिकेने यापूर्वी आॅस्ट्रेलियन तंत्रज्ञानाचा वापर केला होता. मात्र, त्याचाही काही उपयोग झाला नाही.

दर्जेदार काम करण्याची गरज
महापालिका हद्दीत जास्त पाऊस पडत असल्याने खड्डे पडतात, असे कारण महापालिकेकडून पुढे केले जाते. मात्र, खड्डे बुजवण्याचे काम दर्जेदार केल्यास खड्डेच पडणार नाही. त्याकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते. कंत्राटदारावर वचक नसतो. त्यामुळे खड्ड्यांचा सामना सामान्य प्रवासी, नागरिक आणि वाहनचालकांना करावा लागतो, याकडे हळबे यांनी लक्ष वेधले आहे.

Web Title: KDMC's125 crore in 'potholes' in last four years, need for concreteization of roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.