कल्याण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाउनमध्ये शहरात बांधकामांनाही बंदी होती. त्यामुळे काही नव्या इमारतींची बांधकामे अर्धवट स्थितीत होती. आता ज्या इमारतीच्या बांधकामांना परवानगी दिली आहे; त्यांना बांधकाम पूर्ण करता येणार आहे. कंटेनमेंट झोन वगळून काही ठिकाणी अटींच्या आधारे बांधकाम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे दिलासा मिळाला असला, तरी दुसरीकडे ९० टक्के मजूर आपापल्या गावी परराज्यांत गेल्याने विकासकांपुढे पेच निर्माण झाला आहे.तिसऱ्या लॉकडाउनच्या अखेरीस केडीएमसीने परिपत्रक जारी करून परवानगी असलेली बांधकामे पूर्ण करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. कंटेनमेंट झोन वगळून बांधकाम सुरू करण्यास परवानगी देताना महापालिकेकडून अटीशर्ती घालण्यात आल्या आहेत. यात मजुरांच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्याबाबत सांगण्यात आले आहे. मजुरांची बांधकामाच्या ठिकाणीच राहण्याची व्यवस्था करण्यासोबतच ते कंटेनमेंट झोनमधील नसावेत, याकडेही लक्ष वेधले आहे. बांधकामाच्या ठिकाणी असणाºया मजुरांची वैद्यकीय तपासणी महत्त्वाची असून, स्वच्छतेचे आणि सोशल डिस्टन्सिंंगचे मार्किंग, मास्क घालणे आणि बांधकामांच्या ठिकाणी दोनदा जंतुनाशक फवारणी आदी नियम काटेकोरपणे पाळण्याचे नमूद केले आहे.बांधकामांचे ठिकाण महापालिकेने कंटेनमेंट झोन घोषित केल्यास तेथील काम तत्काळ थांबवावे लागेल, अशीही अट घालण्यात आली आहे. संबंधित अटी आणि शर्तींचे पालन न झाल्यास मूळ बांधकाम परवानगी रद्द केली जाईल, असेही परिपत्रकात स्पष्ट केले आहे.लॉकडाउनमध्ये बांधकामांना बंदी असल्याने मजुरांच्या हाताला काम नव्हते. त्यामुळे ८० ते ९० टक्के मजूर परराज्यांत आपापल्या घरी निघून गेले आहेत. त्यामुळे बांधकामाला मजूर मिळणे कठीण होणार आहे. बांधकामाला परवानगी मिळाली असली, तरी मजुरांची टंचाई भेडसावणार आहे.- रवी पाटील, माजी अध्यक्ष, एमसीएचआय कल्याण-डोंबिवली
बांधकामांना केडीएमसीची अखेर सशर्त परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 07:45 IST