Kasarwadwali police of Thane handed over child to mother and father | ठाण्याच्या कासारवडवली पोलिसांनी चिमुकलीला मिळवून दिले आई बाबा

अवघ्या अर्ध्या तासातच घेतला शोध

ठळक मुद्दे अवघ्या अर्ध्या तासातच घेतला शोध आझादनगर येथून वाट चुकल्याने उडाला गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: आझादनगर येथून वाट चुकल्यामुळे घरापासून दुरावलेल्या चार वर्षीय मुलीला पुन्हा तिच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात कासारवडवली पोलिसांना गुरुवारी रात्री यश आले. एका वाटसरुने तिला ताब्यात दिल्यानंतर मोठया कौशल्याने कासारवडवली पोलिसांनी तिच्या आई वडिलांचा शोध घेऊन तिला त्यांच्या स्वाधीन केले.
घोडबंदर रोड येथील आझादनगर, ब्रम्हांड येथे एक चार वर्षीय चिमुकली रस्त्याच्या कडेला रडत असल्याचे एका वाटसरुला १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आढळले. तिला तिच्या आई बाबांबद्दल काहीच माहिती सांगता येत नव्हती. अखेर त्याने तिला कासारवडवली पोलिसांच्या ताब्यात दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शीतल चौगुले, महिला कॉन्स्टेबल फुुफाणे, बीट मार्शल पोलीस नाईक दरेकर आणि घुगे यांनी तिच्या फोटोसह माहिती सोशल मिडियावर प्रसारित केली. त्यानंतर ती ज्या परिसरात मिळाली, त्या भागात तिच्या आई वडिलांचा शोध घेतला. अनेक नागरिकांकडे केलेल्या चौकशीनंतर अखेर अर्ध्या तासांनी या पथकाने तिच्या पालकांचा शोध घेतला. नंतर तिच्या पालकांना पोलीस ठाण्यात पाचारण करुन अखेर तिचे वडील आणि आजी यांच्या ताब्यात तिला दिले. मुलगी सुखरुप मिळाल्यानंतर तिच्या आजीने तिला जवळ कवटाळले. पोलिसांनी तत्परता दाखवून मुलीला परत मिळवून दिल्याबद्दल या पालकांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: Kasarwadwali police of Thane handed over child to mother and father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.