कल्याण-डोंबिवलीत मंडईअभावी गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 01:21 AM2019-09-30T01:21:05+5:302019-09-30T01:21:30+5:30

कल्याण-डोंबिवली परिसरात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत पायाभूत सुविधांची बोंब आहे. या परिसरात अद्याप सुजज्ज भाजी मंडईच नाही.

Kalyan-Dombivali market news | कल्याण-डोंबिवलीत मंडईअभावी गैरसोय

कल्याण-डोंबिवलीत मंडईअभावी गैरसोय

Next

- अनिकेत घमंडी

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली परिसरात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत पायाभूत सुविधांची बोंब आहे. या परिसरात अद्याप सुजज्ज भाजी मंडईच नाही. ज्या मंडया आहेत, त्या सोयीच्या ठिकाणी नसल्यामुळे तिथे ग्राहकच फिरकतच नसल्यामुळे त्या ओस पडल्या असून वास्तू धूळखात आहेत. यामुळे भाजीविक्रेते रस्त्यावरच बसत असून ग्राहकांना तेथूनच खरेदी करावी लागत असल्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. महापालिकेने सोयीच्या ठिकाणी भाजीमंडई बांधण्याची मागणी नागरिक करत आहेत.

डोंबिवली विधानसभा मतदासंघात पश्चिमेला एकही भाजीमंडई नाही. पूर्वेला उर्सेकरवाडीत आहे, पण ती छोटी असून त्या ठिकाणी जाण्यासाठी फेरीवाल्यांचा अडथळा असतो. तसेच तेथील भाजी तुलनेने महागडी असल्याने सर्वसामान्य तिथे फिरकत नाहीत. कल्याण ग्रामीण मतदारसंघातही भाजीमंडई म्हणता येईल अशी वास्तू नाही. कल्याण पूर्व आणि पश्चिमेलाही तीच स्थिती आहे. महापालिका हद्दीत सुसज्ज भाजीमंडई नसल्याने या शहरांमध्ये जागा मिळेल तिथे भाजीविके्रते ठाण मांडतात.

डोंबिवलीमध्येही पूर्वेला रेल्वे स्थानक परिसरात चिमणी गल्ली परिसरात भाजीविक्रेते वर्षानुवर्षे रस्त्यावर व्यवसाय करतात. अनेकदा महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कारवाईला त्यांना सामोरे जावे लागते. महापालिकेच्या सर्वच प्रभागांत हातगाडी विक्रेते, गाळ्यांमध्ये भाजीविक्री केली जाते. पूर्वेला फडके पथ, टाटा लेनजवळ, शिवमंदिर रस्ता, गोग्रासवाडी, नामदेव पथ, गांधीनगर, पीएनटी कॉलनी, स्टार कॉलनी, ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसर, कांचनगाव, एमआयडीसीमध्ये मिलापनगर, नांदिवली चौक, चौक तसेच पश्चिमेला उमेशनगर, दिनदयाळ रस्त्यावर सम्राट चौक, गरिबाचा वाडा, कुंभारखण पाडा, नवापाडा, महात्मा फुले रस्ता, कोपर, राजूनगर आदी भागांमध्ये रस्त्यांवर, तसेच दुकानांमध्ये भाजीविक्रेते आढळून येतात. उमेशनगर येथे रेतीबंदर रस्त्यावर रविवारी मोठा बाजार भरतो. बुधवारीही घनश्याम गप्ते रस्त्यावर आठवडी बाजार भरतो. पूर्वेला सोमवारचा बाजार मानपाडा रस्ता येथे बाजार भरतो. आठवडा बाजारात भाजीविके्रत्यांचे प्रमाण फारसे नसते.

कल्याण पश्चिमेला रेल्वेस्थानकानजीक नाशिक, पुणे, नवी मुंबई भागातून येणाऱ्या होलसेल भाजीविक्रेत्यांसाठी जागा आहे. तसेच, एपीएमसी बाजारपेठ उपलब्ध आहे, पण त्याठिकाणी सर्वसामान्य नागरिक रोज जातील आणि भाजी घेऊ शकतील हे शक्य होत नाही. तेथे महापालिका क्षेत्रासह बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड आदी ठिकाणचे हॉटेल व्यावसायिक, कॅण्टीन व्यावसायिक, भाजीपोळी विक्रेते आदींची पहाटेपासून रीघ लागते. कल्याणला टिळकचौक, पारनाका, शिवाजी चौक, खडकपाडा, स्थानक परिसर, जरीमरी नाका, कोळसेवाडी, वालधुनी, सम्राट चौक, विठ्ठलवाडी आदी परिसरात ठिकठिकाणी भाजीविक्रेते बसतात. हातगाडीवर भाजी घेऊन शहराच्या विविध भागांमध्ये सकाळच्या वेळेत भाजीविक्रेते जातात. त्यांच्याकडूनच भाजीखरेदी केली जात आहे. गोळवली पेट्रोलपंपनजीकचा परिसर, पलावा, काटई परिसर आणि बदलापूर पाइपलाइन रस्त्याच्या कडेला तसेच अन्य काही भागांत किरकोळ विक्रेते व्यवसाय होतो. रस्त्यांवरच भाजीविक्री केली जात असल्याने त्यावर धूळ, कचरा भाज्यांवर उडतो. त्यामुळे मंडई होण्याची मागणी होत आहे.

रिकाम्या वास्तूंमध्ये उपद्रवींचा वावर
महापालिकेच्या अखत्यारीत वास्तूंमध्ये भाजीमंडईसाठीही काही ठिकाणी जागा राखीव आहेत. त्यापैकी ठाकुर्ली येथील मंगलकलश सोसायटीमधील एकमजली भाजीमंडई अनेक वर्षांपासून धूळखात पडली आहे. वापराअभावी तेथे उपद्रवींचा वावर वाढला आहे. तेथील रहिवाश्यांनी यासंदर्भात महापालिकेशी पत्रव्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

अनेकदा टेंडर मागवूनही त्याला प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे महापालिकेच्या मंडईसाठीच्या वास्तू धूळखात पडून आहेत. उर्सेकरवाडीसारख्या मंडईत सतत वर्दळ असलेल्या मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणीही अनेक गाळे रिकामेच आहेत. एखादी संस्था, युवकांचा चमू तयार असेल तर त्यांनी पुढे यावे. आम्ही त्यांना अटीशर्थींची पूर्तता केल्यास वास्तू उपलब्ध करून देऊ. ज्या वास्तू आहेत त्यांचा वापर व्हायलाच हवा.
- प्रकाश ढोले, मालमत्ता व्यवस्थापक, केडीएमसी

Web Title: Kalyan-Dombivali market news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.