कळवा रुग्णालयात अनागोंदी कारभार
By Admin | Updated: November 10, 2016 03:10 IST2016-11-10T03:10:24+5:302016-11-10T03:10:24+5:30
कळव्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात आधीच रुग्णांना दर्जेदार उपचार मिळत नसल्याची ओरड होत आहे. त्यातच, मंगळवारी एका शिकाऊ डॉक्टरचा डेंग्यूने मृत्यू झाला

कळवा रुग्णालयात अनागोंदी कारभार
ठाणे : कळव्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात आधीच रुग्णांना दर्जेदार उपचार मिळत नसल्याची ओरड होत आहे. त्यातच, मंगळवारी एका शिकाऊ डॉक्टरचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्यामुळे आता परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. येथे येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत. गंभीर रुग्णांवर वरिष्ठ डॉक्टरऐवजी शिकाऊ डॉक्टरच उपचार करत असल्याची बाब पुढे आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉ. दिलीप कणसे यांचा मंगळवारी डेंग्यूने मृत्यू झाला. ते राहत असलेल्या रुग्णालयाच्या वसतिगृहात एका बादलीत डेंग्यूच्या अळ्या आढळल्याची माहिती आता समोर आली आहे. २३ आॅक्टोबरला महापालिकेच्या आरोग्य विभागाला माहिती झाल्यानंतर त्यांचे एक पथक तेथे गेले होते. त्यानंतर, त्यांनी येथील डेंग्यूच्या अळ्या नष्ट केल्या होत्या. परंतु, त्याआधीच कणसे यांना डेंग्यूची लागण झाली, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे. त्यामुळे त्यांना २४ आॅक्टोबरला कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तेथे योग्य उपचाराची सुविधा नसल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. या प्रकारामुळे आता तेथे चांगल्या प्रतीचे उपचार मिळत नसल्याची बाब प्रकर्षाने समोर आली आहे. येथे जिल्ह्याच्या विविध भागांतून येणाऱ्या रुग्णांना चांगले उपचार मिळत नसताना आता एका डॉक्टरवरही तीच वेळ ओढवल्याचीही बाब यानिमित्ताने समोर आली आहे.
रुग्णालयात बुधवारी सकाळी ११च्या सुमारास आलेल्या अनेक रुग्णांना वॉर्डबॉयच जागेवर नसल्याचा अनुभव आला. यावेळी दोन तासांहून अधिक काळ रु ग्णांना ताटकळावे लागले. त्यात गंभीर रुग्णही होते. अशा रुग्णाला वॉर्डमध्ये नेण्यासाठी स्ट्रेचरच उपलब्ध नव्हते. तसेच रुग्ण अत्यवस्थ असल्याने त्याला आयसीयूशिवाय पर्याय नसल्याचा दावा करून त्यांना दाखल करून घेण्यास सुरुवातीच्या काळात टाळाटाळ झाली. अखेर, रुग्णाच्या नातेवाइकांनी विनंती केल्यानंतर त्यांच्याकडून लेखी घेतल्यानंतर रुग्णाला दाखल करून घेण्यात आले. त्यानंतर, त्याच्यावर वरिष्ठ डॉक्टर उपलब्ध असतानाही शिकाऊ डॉक्टरांनी उपचार सुरू केले. वरिष्ठ डॉक्टरांबाबत चौकशी केल्यानंतर ते उपलब्ध नसल्याची माहिती येथील कर्मचारी देत होते.
कळवा रु ग्णालयात रोज ठाणे शहर, कळवा, मुंब्रा, दिवा आदी भागांसह जिल्ह्याच्या विविध भागांतून बाह्यरुग्ण विभागात ५०० च्या आसपास रुग्ण येतात. परंतु, केसपेपर काढण्यापासून ते डॉक्टरांकडे क्रमांक लागेपर्यंत एकेका रु ग्णाला चार ते पाच तास लागतात. त्यातही अनेकदा डॉक्टरही नसतात. त्यामुळे त्यांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. आजही सकाळच्या वेळेत हाच अनुभव रु ग्णांना आला. परंतु, आपले कोणीही वाकडे करू शकत नाही, अशा मानसिकतेत असलेल्या कर्मचारी अथवा डॉक्टरांवर कारवाईचा बडगा कोण उगारणार, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.