कळवा अपघात : कंटेनरचालकाला पुण्यातून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 22:49 IST2017-07-31T22:49:33+5:302017-07-31T22:49:33+5:30
खारेगाव टोलनाका ते खारेगाव प्रवेशद्वारादरम्यान एका कंटेनरने दिलेल्या धडकेमुळे अजय शर्मा (३०, रा. कळवा) याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी चंद्रकांत तुपे (४९) याला पुण्यातून शनिवारी कळवा पोलिसांनी अटक केली.

कळवा अपघात : कंटेनरचालकाला पुण्यातून अटक
ठाणे, दि. ३१ - खारेगाव टोलनाका ते खारेगाव प्रवेशद्वारादरम्यान एका कंटेनरने दिलेल्या धडकेमुळे अजय शर्मा (३०, रा. कळवा) याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी चंद्रकांत तुपे (४९) याला पुण्यातून शनिवारी कळवा पोलिसांनी अटक केली. अपघातानंतर त्याने दुचाकीचालकाला सुमाने तीन ते चार किलोमीटरपर्यंत फरफटत नेले होते. त्यातच अजय याचा मृत्यू झाला. सुमारे १०० सीसीटीव्हीतील चित्रणांची तपासणी केल्यानंतर तुपेला पकडण्यात पोलिसांना यश आले.
विवियाना मॉलसमोरील पादचारी पुलाच्या खाली शर्माचा १८ जुलै रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास मृतदेह मिळाला होता. हा खून, आत्महत्या की अपघात, असा संभ्रम वर्तकनगर, कापूरबावडी आणि राबोडी पोलिसांसमोर निर्माण झालेला होता. त्याच वेळी खारेगाव टोलनाक्याजवळ दुचाकीवरील या चालकाला वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे आढळले. ठाण्याचे पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी यांनी याप्रकरणी सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ, कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.एम. बागवान, संजीव पाटील, तुकाराम पावले, अशोक उतेकर आणि राबोडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रासम आदींची वेगवेगळी पथके तयार केली. खारेगाव टोलनाका ते मुलुंडच्या मॉडेला चेकनाका तसेच घटनास्थळासमोरील इमारती तसेच इतर ठिकाणचे अशा सुमारे १०० सीसीटीव्हींची या पथकांनी पडताळणी केली. त्या वेळी मॉलसमोरील एका चित्रणात एका कंटेनरला एक व्यक्ती लटकलेल्या अवस्थेत आढळली. हा कंटेनर तिथून गेल्यानंतर मॉडेला चेकनाका परिसरातील एका सीसीटीव्हीमध्ये हाच कंटेनर आढळला. लोखंडी गार्ड तुटलेले, सिद्धिविनायक नाव आणि क्रमांक अस्पष्ट इतकेच वर्णन मिळाल्यानंतर या तुपे या कंटेनरचालकाला कंटेनरसह कळवा पोलिसांनी २९ जुलै रोजी पुण्यातून ताब्यात घेतले. अपघातानंतर गाडी थांबवली, तर नागरिक मारतील, या भीतीने गाडी तशीच दामटल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.
असा झाला अपघात
अजय आणि त्याचा मित्र अजिंक्य शर्मा (२८, मूळचे दोघेही राहणार हिमाचल प्रदेश) हे दुचाकीवरून मुंबई-नाशिक मार्गावरील खारेगाव प्रवेशद्वाराजवळून जात होते. त्यांना समोरून येणाºया एका वाहनाची जोरदार धडक बसली. या अपघातात अजयच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जखमी झाला. तर, अजिंक्यलाही मार लागल्यामुळे तो बेशुद्ध पडला. अजय मात्र घोडबंदर रोडवरील एका मॉलसमोरील स्कायवॉकखाली राबोडी पोलिसांना मिळाला.