Just like the rope in BJP-Sena in Ulhasnagar for the post of Mayor | महापौरपदासाठी उल्हासनगरात भाजप-सेनेमध्ये रस्सीखेच
महापौरपदासाठी उल्हासनगरात भाजप-सेनेमध्ये रस्सीखेच

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : भाजपमधील ओमी टीम समर्थक काही नगरसेवक भूमिगत झाल्याने महापौरपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. भाजप आघाडीकडून गटनेते जमनुदास पुरस्वानी व साई पक्षप्रमुख जीवन इदनानी, तर शिवसेनेतर्फे लीलाबाई अशान यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केला. उपमहापौरपदासाठी भाजपकडून विजय पाटील, टोणी सिरवानी, तर शिवसेनेकडून रिपाइंचे भगवान भालेराव आणि राष्ट्रवादीचे भरत गंगोत्री यांनी अर्ज दाखल केला असून, २२ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे.

उल्हासनगर महानगरपालिकेत भाजप-ओमी टीम व साई पक्षाची आघाडी सत्तेत आहे. विरोधी बाकावर शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं व इतर लहान पक्ष आहेत. महापालिकेत भाजप-ओमी टीमचे-३१ व साई पक्षाचे-१२, शिवसेनेचे-२५, राष्ट्रवादी-४, रिपाइं-३, तर भारिप, काँग्रेस व पीआरपी यांचे प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे. भाजप आघाडीकडे एकूण ४३, तर शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य पक्ष मिळून एकूण ३५ नगरसेवक आहेत. बहुमतासाठी ४० नगरसेवकांची आवश्यकता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी शब्द देऊन महापौर पंचम कलानी यांना उमेदवारी न दिल्याने, भाजपमधील काही ओमी टीम समर्थक नगरसेवक नाराज आहेत. अशातच ओमी कलानी हे टीमच्या काही समर्थक नगरसेवकांसह भूमिगत झाल्याची चर्चाही शहरात रंगली आहे.

भाजपमधील ओमी टीम समर्थक नगरसेवकांनी बंडखोरी केली तर, शिवसेनेच्या लीलाबाई अशान महापौरपदी निवडून येण्याची शक्यता आहे. यासाठी पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी स्वत: पुढाकार घेतल्याचे बोलले जात आहे.
भाजपमधील नाराज ओमी टीम नगरसेवकांचा फायदा घेण्यासाठी शिवसेना पुढे सरसावली असून शिवसेना नगरसेवक अरुण अशान हे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत. लीलाबाई अशान त्यांच्या आई आहेत. सलग तीनवेळा लीलाबाई अशान नगरसेवक म्हणून निवडून आल्या असून, त्यांनी यापूर्वी महापौरपद भूषविले आहे. भाजप आघाडीचे गटनेते जमनुदास पुरस्वानी व साई पक्षप्रमुख जीवन इदनानी यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. उपमहापौरपदासाठी भाजप आघाडीकडून विजय पाटील व साई पक्षाचे टोणी सिरवानी यांनी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादीचे भरत गंगोत्री व रिपाइंचे भगवान भालेराव यांनीही उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केले आहेत.

भाजप करणार व्हिप जारी
भाजपाच्या एकूण ३१ नगरसेवकांना मंगळवारी पक्षादेश (व्हिप) जारी करणार असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ता मनोज लासी यांनी दिली. यामध्ये ओमी टीम समर्थक नगरसेवकांचाही समावेश आहे. यावर ओमी टीमचे प्रवक्ते कमलेश निकम यांनी टीमचे समर्थक नगरसेवक शहरहिताचा निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया दिली. एकूणच भाजपमधील ओमी टीम समर्थक नगरसेवकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Just like the rope in BJP-Sena in Ulhasnagar for the post of Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.