शीळमधील बेकायदा बांधकामांची न्यायालयीन चौकशी; अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. जी. बन्साली यांची नियुक्ती

By जितेंद्र कालेकर | Updated: June 23, 2025 22:07 IST2025-06-23T22:06:49+5:302025-06-23T22:07:31+5:30

या प्रकरणातील जमीनमालक, बांधकाम व्यावसायिक तसेच पालिका अधिकारी या सर्वांचीच चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

judicial inquiry into illegal constructions in shil additional sessions judge g g bhansali appointed | शीळमधील बेकायदा बांधकामांची न्यायालयीन चौकशी; अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. जी. बन्साली यांची नियुक्ती

शीळमधील बेकायदा बांधकामांची न्यायालयीन चौकशी; अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. जी. बन्साली यांची नियुक्ती

जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : मुंब्रा येथील शीळ भागातील बहुचर्चित १७ बेकायदा इमारत बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार साेमवारपासून न्यायालयीन चौकशी सुरू झाली आहे. ठाणे जिल्हा मुख्य सत्र न्यायाधीश एस. बी. अग्रवाल यांनी ठाणे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. जी. बन्साली यांची नियुक्ती केली. या प्रकरणातील जमीनमालक, बांधकाम व्यावसायिक तसेच पालिका अधिकारी या सर्वांचीच चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंब्रा येथील शीळ भागात साडेसहा एकराच्या जागेवर या बेकायदा इमारती उभारल्या आहेत. या बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल होती. याच पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे पालिकेने १७ पैकी १२ इमारतींची बांधकामे जमीनदोस्त केली. उर्वरित बांधकामेही तोडण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे.

एक वरिष्ठ न्यायिक अधिकारी नियुक्त करून या बांधकामांमध्ये जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करावी, त्यात पालिका अधिकारी आणि आयुक्तांसह जबाबदारी निश्चित करावी. या चौकशीचा अहवाल सहा आठवड्यांच्या आत उच्च न्यायालयात सादर करावा. न्यायालयाने नेमलेला अधिकारी संबंधित व्यक्तींची साक्ष तसेच नोटिसा देण्याची प्रक्रिया राबविणार आहे.

न्या. बन्साली यांच्या अहवालानंतर जाे अहवाल येईल, त्यावर पुढील आदेश न्यायालयाकडून दिला जाणार आहे. यात पालिका अधिकारी किंवा काेणीही दाेषी आढळेल त्यावर कारवाई केली जाणार आहे. साेमवारी पहिल्याच दिवशी दाेन बांधकाम व्यावसायिक, तक्रारदार तसेच दाेन साक्षीदार यांचे न्यायाधीश बन्साली यांनी जबाब नाेंदवले.

४०० ते ५०० कोटींचा घोटाळा

या प्रकरणाची व्याप्ती माेठी आहे. त्यामुळे चाैकशीत माेठी नावे समाेर येण्याची शक्यता आहे. येथे १७ इमारती उभ्या राहिल्या. त्यातील एका इमारतीत १५० सदनिका हाेत्या. त्यांची १५ ते २० लाखांमध्ये विक्री झाली. हे सर्व व्यवहार राेखीत झाले. त्यामुळे ४०० ते ५०० काेटींचा घाेटाळा असल्याचे बाेलले जात आहे.

Web Title: judicial inquiry into illegal constructions in shil additional sessions judge g g bhansali appointed