जोशी रुग्णालयाला गळती

By Admin | Updated: June 15, 2016 01:01 IST2016-06-15T01:01:41+5:302016-06-15T01:01:41+5:30

पालिकेने जानेवारी २०१६ मध्ये लोकार्पण केलेल्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्याला अवघ्या पाच वर्षांतच गळती लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

Joshi Hospital leakage | जोशी रुग्णालयाला गळती

जोशी रुग्णालयाला गळती

भार्इंदर : पालिकेने जानेवारी २०१६ मध्ये लोकार्पण केलेल्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्याला अवघ्या पाच वर्षांतच गळती लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने बांधकामासाठी झालेला कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
पालिकेने १६ एप्रिल २००७ च्या महासभेतील ठरावानुसार भार्इंदर पश्चिमेस सुमारे २०० खाटांच्या चार मजली टेंभा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम २०११ मध्ये पूर्ण केले. हे रुग्णालय चालवणे आवाक्याबाहेर असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर ते राज्य सरकार किंवा सेवाभावी, धर्मादाय संस्थेमार्फत चालवण्याचा प्रस्ताव १४ डिसेंबर २०१२ च्या महासभेत मंजूर केला. परंतु, उच्च न्यायालयात २००६ मध्ये दाखल जनहित याचिकेनुसार हे रुग्णालय पालिकेनेच सुरू करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. त्यामुळे पालिकेने ६ मार्च २०१३ रोजी न्यायालयात रुग्णालय हस्तांतरणाला परवानगी मिळण्याच्या उद्देशाने केलेला दिवाणी अर्ज २८ मार्च २०१४ च्या सुनावणीवेळी फेटाळला. रुग्णालय चालवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने ते सरकारने चालवावे, यासाठी पालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तेथेही पालिकेचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे रुग्णालय सुरू करण्यासाठीची आर्थिक समस्या मार्गी लागावी, यासाठी पालिकेने अंदाजपत्रकातील तरतुदीखेरीज अशासकीय देणग्यांतून निधी जमवण्याचा प्रस्ताव जानेवारी २०१५ मध्ये तयार केला. त्याला २ मार्च २०१५ च्या महासभेत मंजुरी देण्यात आली.
अशासकीय देणग्या स्वीकारण्याचे धोरण १७ जून २०१५ च्या महासभेत ठरवण्यात आले. त्याला शहरातील अनेक उद्योजकांनी भरभरून सहकार्य केले. त्या देणग्यांच्या जोरावर १० जानेवारी २०१६ रोजी प्रशासनाने रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा पार पाडला. त्यावेळी रुग्णालयाच्या इमारतीसाठी २३ कोटी तर इतर खर्चापोटी पाच कोटींचा खर्च केला. न्यायालयीन वादासह आर्थिक ताळमेळ बसवण्यात रुग्णालय सुरू होण्यास पाच वर्षांचा कालावधी लागला. बांधकाम सुरू असताना त्याकडे प्रशासनाचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष झाल्याने ते निकृष्ट दर्जाचे ठरल्याचा प्रत्यय या रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून होणाऱ्या गळतीवरून येत आहे. (प्रतिनिधी)


नागरिकांच्या पैशांचा अपव्यय
याबाबत, रुग्णालयाचा पाठपुरावा करणारे माजी नगरसेवक मिलन म्हात्रे म्हणाले, इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असतानाही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, लागलेल्या गळतीमुळे नागरिकांच्या पैशांचा अपव्यय झाला आहे. याला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई होऊन होणारे नुकसान त्यांच्याकडून भरून घ्यावे.

आठ दिवसांपूर्वीच
केली पाहणी
आयुक्त अच्युत हांगे म्हणाले की, आठ दिवसांपूर्वीच स्वत: पाहणी करून संबंधित कंत्राटदाराला काम त्वरित पूर्ण करण्यास सांगितले आहे.

Web Title: Joshi Hospital leakage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.