कल्याण रेल्वेस्थानक परिसरात पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:54 IST2021-02-25T04:54:55+5:302021-02-25T04:54:55+5:30
कल्याण : पश्चिमेतील रेल्वेस्थानक परिसरातील दिलीप कपोते वाहनतळ स्मार्ट सिटीअंतर्गत विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे हे वाहनतळ मंगळवारपासून पार्किंगसाठी ...

कल्याण रेल्वेस्थानक परिसरात पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर
कल्याण : पश्चिमेतील रेल्वेस्थानक परिसरातील दिलीप कपोते वाहनतळ स्मार्ट सिटीअंतर्गत विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे हे वाहनतळ मंगळवारपासून पार्किंगसाठी बंद केले आहे. परिणामी, या वाहनतळात उभी केली जाणारी एक हजार १०० वाहने आता कुठे उभी करायची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्टेशन परिसराचा कायापालट करण्याची योजना आहे. रेल्वेस्टेशन परिसरातील केडीएमसीच्या कपोते वाहनतळात एक हजार १०० दुचाकी उभी करण्याची व्यवस्था आहे. या वाहनतळाचाही विकास केला जाणार असल्याने ते ‘स्मार्ट सिटी’च्या कंत्राटदाराकडे हस्तांतरित केले आहे. वाहनतळ बंद झाल्याने दुचाकी कुठे उभ्या करायच्या, असा प्रश्न दुचाकीचालकांना पडला आहे. स्टेशन परिसरात इतकी मोठी वाहनसंख्या असलेले दुसरे वाहनतळ नाही. तसेच केडीएमसीनेही वाहनांसाठी पर्यायी व्यवस्था केलेली नसल्याने गैरसोय होत असल्याचे दुचाकीचालकांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या काळात रिक्षा बंद होत्या. त्यामुळे रिक्षास्टॅण्डचा वापर दुचाकीचालक पार्किंगसाठी करीत होते. जूनमध्ये अनलॉक होताच रिक्षा सुरू झाल्या. तरीही रिक्षास्टॅण्डमध्ये दुचाकी उभ्या केल्या जात होत्या. तसेच कपोते वाहनतळासमोरही रस्त्यावर स्कायवॉकखाली दुचाकी उभ्या केल्या जात होत्या. आता वाहनतळ बंद झाल्याने रस्त्यावर आणि रिक्षास्टॅण्डच्या काही जागेत दुचाकी उभ्या केल्या जात आहेत. या बेकायदा पार्किंगविरोधात वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.
------------------