Investment and Ingrid Bergman | गुंतवणूक आणि इनग्रिड बर्गमन

गुंतवणूक आणि इनग्रिड बर्गमन

- चन्द्रशेखर टिळक

गेल्या १० दिवसात श्रेष्ठ आणि ज्येष्ठ अभिनेत्री इनग्रिड बर्गमन यांच्याशी संबंधित २ पुस्तके एकापाठोपाठ एक वाचली. एक म्हणजे अलन बर्गेन लिखित ‘माय स्टोरी’ हे पुस्तक आणि दुसरं म्हणजे याच पुस्तकाचा आशा कर्दळे यांनी केलेला मराठी अनुवाद.

दोन्ही पुस्तके वाचताना काही मुद्दयांवर वारंवार रेंगाळयला झाले. तेंव्हापासून त्यावर नकळतपणे विचार सुरु झाला आणि जाणावयला लागले की हे पुस्तक एका अभिनेत्रीविषयी आहे. पण हे विचार तेवढ्यापुरते मर्यादीत नाहीत. एकंदरीतच अर्थकारण आणि विशेषत: गुंतवणूकक्षेत्राला, चपखलपणे लागू पडतात. त्याची सुरुवात झाली ती या पुस्तकात एका प्रसंगात इनग्रिड बर्गमन या नवरा डॉ.पीटर याला सांगतात, तिथपासून ‘अरे, सगळेजण फक्त विमा आणि कर्जरोखे यातच आपल्यासारखी त्यांची गुंतवणूक मोजत नाहीत रे !’ असा उल्लेख मी तरी सहसा अभिनय क्षेत्रातील व्यक्तींच्या चरित्रात फारसा वाचलेला नाही! त्याहीपेक्षा प्रभावी मुद्दा म्हणजे स्वत:च्या अभिनय कारकिर्दीचे वर्णन करताना इनग्रिड यांनी उपयोगात आणलेले २ शब्दप्रयोग ‘आशावादी आत्मवंचना’ आणि ‘काव्यमय वास्तवता’.

हे दोन्ही शब्दप्रयोग वाचून सारखे वाटत होते की, हे इनग्रिड यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीलाच नव्हे तर या ना त्या प्रमाणात, या ना त्या तºहेने तुमच्या- माझ्यासारख्या सामान्य माणसांबाबतही खरे आहेतच की! विशेषत: आपल्या स्वत:च्या गुंतवणुकीविषयी आणि विशेषत: शेअरबाजारातील गुंतवणुकीविषयी.

इनग्रिड यांनी केलेला शब्दप्रयोग ‘आशावादी आत्मवंचना’ असं काहीसं मनात घोळत असताना जेंव्हा आपल्याला मनाविरुद्ध किंवा अगदी आपल्या नकळत शेअरबाजारातील गुंतवणुकीत जावे लागते किंवा ढकलले जाते आणि त्यातच चांगले उत्पन्न, परतावा मिळतो तेंव्हा एका बाजूला आपले ग्रह-पूर्वग्रह आणि दुसऱ्या बाजूला हे उत्पन्न याचे वर्णन करायला एकच शब्दसमूह असतो... तो म्हणजे ‘काव्यात्मक वास्तवता’.

हेच बघा ना शेअरबाजारात धोका असतो म्हणून अनेकजण शेअरबाजाराच्या नावाने बोटं मोडत असतात. पण अशी मंडळी निरनिराळ्या बँकांच्या वेगवेगळ्या योजनांचा स्वत:च्या गुंतवणुकीसाठी विचार करतात. काही प्रमाणात ते बरोबरही आहे. अगदी इथे उत्पन्नाचे प्रमाण ‘कदाचित’ कमी असेल ; पण ते सुरक्षित मार्ग आहेत असं सांगितले जाते. सध्या ज्या प्रमाणात, ज्या पद्धतीने आपल्या देशाच्या बँकिंग क्षेत्राविषयी उलटसुलट बातम्या येत आहेत हे बघता कदाचित हे विशेषण बँकांमध्ये ठेवलेल्या ठेवींवरील मिळणाºया कमी व्याजदराचे की त्या ठेवींच्या सुरक्षिततेसाठी आहे, असा प्रश्न पडतो. त्याचवेळी गेल्या काही महिन्यात रिझर्व्हबँकेने काही बँकांविषयी उचललेली दंडात्मक किंवा कारवाईत्मक पावले आणि पीएमसी बँकेबाबत बसलेल्या धक्क्याने काहींना आलेला मृत्यू हेही वास्तव आहेच. याला ‘काव्यमय वास्तवता’ म्हणतात.

याचाच दुसरा पैलू म्हणजे जाणीवपूर्वक शेअरबाजारात गुंतवणूक टाळणारे अनेक गुंतवणूकदार पैशांची गुंतवणूक आयुर्विमा महामंडळसहीत अनेक विमा कंपन्यांच्या योजनात पैसे गुंतवत असतात. स्वत:च्या आयुष्याचा पुरेशा प्रमाणात विमा हा उतरवलाच पाहिजे. त्यात चूक नाही. फक्त याबाबत पडणारा प्रश्न हाच की अशा आयुर्विमा योजना आयुर्विमा म्हणून कितीवेळा घेतल्या जातात? गुंतवणूक म्हणून कितीवेळा घेतल्या जातात? आणि आयकरात सवलत म्हणून कितीवेळा घेतल्या जातात? कारण काहीही असो... परिणाम योग्य असल्यामुळे त्याला विरोध करता येणार नाही. याला म्हणता येईल का ‘काव्यमय वास्तवता’ की ‘आशावादी आत्मवंचना?’

हे आठवायचे कारण म्हणजे अगदी अलीकडेच जाहीर झालेली बातमी म्हणजे २०१८-१९ सालासाठी आयुर्विमा महामंडळाने आपल्या विमाधारकांना जाहीर केलेला ५० हजार कोटी रुपयांचा विक्र मी बोनस. ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. एलआयसी हा आपल्या देशाच्या शेअरबाजारातील अत्यंत महत्त्वाचा, मोठा आणि जुना ‘खिलाडी’ आहे. मग याला ‘आशावादी आत्मवंचना’ म्हणायचे की ‘काव्यमय वास्तवता’?

पुस्तकातला एक प्रसंग यापुढे आठवतो की इनग्रिडने तिच्या नवºयापासून घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केले. तिच्यावर टीकेची झोड उठली. पण लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे शब्द आणि कृतीने ठामपणे तिच्या बाजूने उभे राहिले. त्यावेळी हेमिंग्वे म्हणाले होते, आपल्या गुुंतवणूक निर्णयाची चर्चा करायला याहूनही चांगले शब्द मिळतील असं वाटत नाही. याचं कारण म्हणजे आपल्या गुंतवणुकीविषयी निर्णय घेताना आपली पारंपरिक मानसिकता. आपल्या जुन्या मानसिकतेपासून घटस्फोट घेतल्याशिवाय काही वेगळ्या मार्गांचा मोकळेपणाने विचार करता येईल का? अगदी बदलत्या परिस्थितीनुसार बदलत्या मानसिकतेतूनच निर्णय घेतले गेले पाहिजेत! म्हणजे पुन्हा आलंच ना ‘आशावादी आत्मवंचना’ की ‘काव्यमय वास्तवता’? जुने सगळे एकदमच सोडूनच द्यायचे असा त्याचा जरासुद्धा अर्थ नाही. ते कोणत्याही परिस्थितीत कधीच, कोणालाही शक्य नाही.

या पुस्तकात इनग्रिडच्या एका वाक्याची हमखास आठवण येते. ती म्हणते ‘सत्य परिस्थिती हट्टीपणाने नाकारल्याने आणि निराशपणे संघर्ष केल्याने पुढील काळात आपण फक्त दु:खी होतो.’ आपण एखाद्या गुंतवणूक क्षेत्राकडे किंवा संधीकडे पाहताना वेगळे काही करत असतो का? सिनेनाट्य जगात जरी तुझ्यावर पराकोटीची टीका करत असली तरी तू त्याच्याकडे दुर्लक्ष करून स्वत:च्या निर्णयावर ठाम राहा आणि आयुष्याचा नवीन डाव आनंदाने जग असा सल्ला हेमिंग्वे इनग्रिडला याच पत्रात देतात. ते तिला सांगतात की, ‘अमेरिका- युरोपमधील सिनेनाट्य जगताविषयी कोणताही आकस मनात बाळगू नकोस. उलट दुप्पट जोमाने इथे काम कर.’ ते लिहितात की, ‘आपल्याला इथेच, याच जगात खेळायचे असल्यामुळे मैदानाबद्दल तक्रार करून चालणार नाही.’ हे वाक्य वाचून मी अंतर्बाह्यथरारून उठलो. हे वाक्य म्हणजे शरणागती नाही ; सकारात्मक स्वीकृती आहे. ती आयुष्याच्या प्रत्येक क्षणात खरी आहे. मग गुंतवणूक क्षेत्र त्याला कसं अपवाद असेल ? ही निव्वळ ‘आशावादी आत्मवंचना’ नाही आणि ‘काव्यमय वास्तवता’ ही नाही. तो आयुष्याचा पासवर्ड आहे. ज्याला कधीच कंट्रोल, अल्ट आणि डिलिट करता येणार नाही.

या पुस्तकात इनग्रिडच्या आयुष्यात डोकावलेल्या ‘जोन आॅफ आर्क’ या साहित्यकृतीतील वाक्याचा इनग्रिडने नंतरच्या आयुष्यात एका पत्रात उल्लेख केला आहे, ते वाक्य म्हणजे ‘स्वत:ला मदत करा ; म्हणजे देव तुम्हाला मदत करेल.’ पण असे वागणे अगदी सहज जमणार नसेल तर दिग्दर्शक आल्फ्रेड हिचकॉक इनग्रिडला सांगतो ‘तुला माझ्यासारखे करता येत नसेल तर माझी कॉपी कर.’ आपण वॉरेन बफे, आयुर्विमा महामंडळ आणि यांच्यासारख्या दिग्गजांची कॉपी तरी करणार का ? त्या प्रमाणाची जमली तर उत्तमच ; पण निदान त्या प्रवृत्तीची तरी!

इनग्रिड आणि गुंतवणूक यांची सांगड घालण्याचा मोह न आवरण्याचे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे एकाच प्रकारच्या भूमिका एकाच पद्धतीने वारंवार करून आपला एक साचा होऊ न देत यशस्वी होण्यास तिने दिलेला ठाम कृतीशील नकार. हा स्वभाव तत्कालिन हॉलिवूड साच्यात जरासुद्धा बसणारा नव्हता. तिने तीनवेळा केलेली लग्नं, सामंजस्य दाखवत केलेल्या घटस्फोट कारवाया, घटस्फोटित असूनही आधीच्या नवºयाबरोबर राखलेले सौर्हादपूर्ण संबंध, तिन्ही लग्न मिळून असणाºया चारही मुलांवर असणारे वात्सल्य हे सगळे अनोखे आहे. प्रत्येक नातेसंबंध कायद्याच्या चौकटीत उभं न करता त्याला त्याची भावनिक मोकळीक देण्याचा तिचा हा स्वभाव गुणवैशिष्ट्य गुंतवणुकीसारख्या आर्थिक आणि सतत बदलणाºया क्षेत्रांत किती आणि कसा महत्त्वाचा आहे हे वेगळेपणाने सांगण्याची गरज नाही.

घटस्फोट हा नातेसंबंधाचा शेवट असू शकतो ; तपशीलात्मक अद्ययावततेचा आणि संपर्काचा नाही हे इनग्रिडचे तत्व गुंतवणूक क्षेत्रात अत्यावश्यक आहे. अगदी यातले काहीच लगेच जमले नाही तरी तसं निराश व्हायचे कारण नाही. कारण या दोन्ही पुस्तकांत उल्लेख आहे की, इनग्रिड सतत तिच्या दिग्दर्शकांना सांगायची, ‘त्याचा संदर्भ नक्कीच वेगळाच आहे’. पण आपल्या संदर्भात संदर्भानुसार जोडून घ्यायला काय हरकत आहे? इनग्रिड आणि गुंतवणूक यांचा संबंध जोडण्याचे अजूनही एक कारण म्हणजे सिनेदिग्दर्शक गुस्ताव मोलँडरने इनग्रिडचे केलेले वर्णन म्हणजे तो म्हणतो ‘इनग्रिडला कोणीच शोधून काढले नाही. कुणीच तिला मोठे केले नाही. तिनेच स्वत:ला शोधले.’ आपणही गुंतवणूकदार म्हणून स्वत:ला शोधले पाहिजे, घडवले पाहिजे.
(लेखक ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आहेत.)
 

Web Title: Investment and Ingrid Bergman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.