उल्हासनगर मालमत्ता कर माफी प्रकरणाची चौकशी, करनिर्धारकांची उचलबांगडी, उपोषण मागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 15:18 IST2025-05-28T15:17:55+5:302025-05-28T15:18:51+5:30
Ulhasnagar News: महापालिका मालमत्ता कर विभागाने एका मोठ्या कंपनीला ९ कोटीची कर माफी दिल्याच्या प्रकरणाची व संबधित अधिकाऱ्याची चौकशी करण्याचे आदेश आयुक्तानी दिले. तसेच प्रभारी करनिर्धारक संकलक अधिकाऱ्याची उचलबांगडी केल्याने, नरेश गायकवाड यांनी उपोषण मागे घेतले.

उल्हासनगर मालमत्ता कर माफी प्रकरणाची चौकशी, करनिर्धारकांची उचलबांगडी, उपोषण मागे
- सदानंद नाईक
उल्हासनगर - महापालिका मालमत्ता कर विभागाने एका मोठ्या कंपनीला ९ कोटीची कर माफी दिल्याच्या प्रकरणाची व संबधित अधिकाऱ्याची चौकशी करण्याचे आदेश आयुक्तानी दिले. तसेच प्रभारी करनिर्धारक संकलक अधिकाऱ्याची उचलबांगडी केल्याने, नरेश गायकवाड यांनी उपोषण मागे घेतले.
उल्हासनगर महापालिकेने एका मोठ्या कंपनीचा ९ कोटींचा मालमत्ता कर माफ केल्याचा प्रकार गेल्या काही महिन्यापूर्वी गाजला होता. भाजपच्या एका नेत्याने यावर आक्षेप घेऊन याप्रकरणी चौकशीची मागणी लावून धरली होती. तत्कालीन आयुक्तानी याप्रकरणी चौकशी समिती स्थापन करून अहवाला नंतर कारवाईचे संकेत दिले होते. तेंव्हा पासून हे प्रकरण धुळखात पडले. तसेच एका बँकेलाही अभय योजने वेळी कोट्यावधीची सवलत दिल्याचा प्रकार उघड होऊन कारवाईची मागणी झाली होती. दरम्यान समाजसेवक व शरद पवार गटाचे पदाधिकारी नरेश गायकवाड यांनी ९ कोटीची मालमत्ता कर माफी प्रकरणी कारवाईची मागणी करून त्या निधीतून महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी देण्याची मागणी करीत महापालिका मुख्यालया समोर बेमुदत उपोषण सुरु केले होते.
महापालिका उपोषणाला दाद देत नसल्याच्या निषेधार्थ गायकवाड यांनी सोमवार पासून अर्धनग्न अवस्थेत उपोषण सुरु केले. अखेर उपायुक्त डॉ दीपाली चौगले यांनी उपोषणकर्ते गायकवाड यांची भेट घेतली. याप्रकरणाची सेवानिवृत्त अधिकारी उदय भोसले यांची आयुक्तानी चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करून ते एका महिन्यात प्रभारी करनिर्धारक संकलक निलम कदम, सचिन वानखेडे, राम आयलानी यांचे विरूध्द चौकशी करणार आहेत. तसेच निलम कदम यांचा करनिर्धारक पदाचा पदभार सहाय्यक आयुक्त मयूरी कदम यांच्याकडे देण्यात आला. असे लेखीपत्र उपायुक्त चौगले यांनी उपोषणकर्ते गायकवाड यांना दिल्यावर, गायकवाड यांनी बिनशर्त उपोषण मागे घेतले.