आंतरराष्ट्रीय योग दिनी ठाण्यात शिक्षक, पालकांनी अनुभवला इ योगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 14:10 IST2020-06-21T14:06:28+5:302020-06-21T14:10:48+5:30
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आनंद विश्व गुरुकुल आयोजित इ योगा पार पडला.

आंतरराष्ट्रीय योग दिनी ठाण्यात शिक्षक, पालकांनी अनुभवला इ योगा
ठाणे : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिक्षक आणि पालकांनी इ योगा अनुभवला. कोविडच्या परिस्थितीत रोगप्रतिकार क्षमता वाढविण्याच्या दृष्टीकोनातून शिक्षक आणि पालकांकडून योगासने करून घेण्यात आली. सध्याच्या परिस्थितीत चिंतेपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी योगा हे 'बॉडीगार्ड'ची भूमिका बजावत असल्याचे यावेळी योग शिक्षिकांनी सांगितले.
आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने रविवारी झूमवरून इ योगाचे आयोजन केले होते. सुरुवातीला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा हर्डीकर यांनी प्रस्ताविक केले. योगासनाची सुरुवात प्रार्थनेपासून करण्यात आली. घंटाळी मित्र मंडळाच्या ज्येष्ठ योग शिक्षिका नंदिनी छत्रे आणि आनंद विश्व गुरुकुलच्या योग शिक्षिका कल्याणी काळे यांनी ऑनलाइन मार्गदर्शन करून योगाची प्रात्यक्षिके दाखविली. कोविडमुळे घराबाहेर पडणे अशक्य असले तरी इ योगाच्या माध्यमातून योगासने प्रत्येकाला शिकता येतात. कोविड आधी बंद खोलीत योगा शिकविला जात होता परंतू या परिस्थितीत शिकविल्या जाणाऱ्या इ योगा मुळे तो जगभर पसरत असल्याचे शिक्षिकांनी सांगितले. ज्येष्ठ योग शिक्षिका छत्रे यांनी प्रत्येक आसनांची माहिती देऊन त्याचे फायदेही सांगितले. योग हा संस्कार आणि संस्कृती आहे, त्याच्याप्रती आपण कृतज्ञ राहिले पाहिजे. योगा हे एका दिवसापूरते न ठेवता योगसाधना हे रोजच्या जीवनातील नित्यकर्म असले पाहिजे असे त्यांनी सांगितले. इ योगा शिकताना अडचणी येत नाही आणि घरबसल्या शिकत असल्याने जागेचा आणि वेळेचा प्रश्न उदभवत नाही असा अनुभव ही यावेळी व्यक्त केला. सध्याच्या परिस्थितीत रोगप्रतिकारक क्षमता वाढविणे महत्त्वाचे असल्याने ही क्षमता वाढविणारे आसने शिक्षक आणि पालकांना शिकविण्यात आली. काळे यांनी प्राणायमचे महत्त्व पटवून दिले. त्या म्हणाल्या, प्राणायामाने श्वसन क्षमता वाढते, या परिस्थितीत सध्या जो ताण आला आहे तो दूर होतो. मनःशांती मिळते, चिंतेपासून थोडा वेळ का होईना आपण दूर राहतो आणि सकारात्मक विचारपर्यंत येऊ शकतो. सध्या बाहेर जाणे शक्य नसले तरी प्रत्येकाने घरात राहूनच योगा केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक शिक्षक आणि पालकांनी आवडीने यात भाग घेतला होता. तंत्रज्ञानाची बाजू गौतम थोरवे यांनी सांभाळली. यावेळी उपमुख्यध्यापिका दीपिका तलाठी यांनीही सहभाग घेतला होता.