ज्वेलर्सचे दुकान लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा ७२ तासांत पर्दाफाश
By जितेंद्र कालेकर | Updated: December 24, 2024 21:28 IST2024-12-24T21:27:31+5:302024-12-24T21:28:02+5:30
खंडणीविराेधी पथकासह मध्यवर्ती शाेधपथकाची संयुक्त कारवाई : २९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

ज्वेलर्सचे दुकान लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा ७२ तासांत पर्दाफाश
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाण्यातील नौपाडा भागातील वामन शंकर मराठे ज्वेलर्स या सोने-चांदीच्या दागिन्यांच्या दुकानातून २८ लाख ७७ हजारांचे दागिने लुटणाऱ्या लीलाराम ऊर्फ लीलेश मेघवाल (२९, रा. सुरत, मूळ रा. जालोर, राजस्थान) याच्यासह पाचजणांच्या टोळीला अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी मंगळवारी दिली. हे सराईत चोरटे असून त्यांच्याकडून ४८३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, साडेपाच किलो वजनाची चांदीची नाणी, भांडी, दागिने, इमिटेशन ज्वेलरी आणि मोबाईल फोन असा २९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
१७ डिसेंबर २०२४ रोजी पहाटे १:५० ते ४:३० वाजण्याच्या सुमारास दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वाराचा कडीकोयंडा तोडून चाेरट्यांनी आत शिरकाव करून २८ लाख ७७ हजार ४९० रुपयांचे सोन्याचे दागिने पळविले हाेते. नौपाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण समांतर तपासासाठी पाेलिस आयुक्त आशुताेष डुंबरे यांनी गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविले होते. अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. पंजाब उगले यांनी खंडणीविरोधी पथक, मध्यवर्ती गुन्हे शाेध, युनिट एक आणि नौपाडा पोलिस यांची चार वेगवेगळी पथके तयार केली.
सहायक पोलिस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे निरीक्षक नरेंद्र पवार, सहायक पोलिस निरीक्षक सुनील तारमळे, श्रीकृष्ण गोरे, भूषण कापडणीस, उपनिरीक्षक विजयकुमार राठोड आणि मध्यवर्ती शोधपथकाचे निरीक्षक संजय शिंदे, आदींच्या पथकाने दुकानातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे कौशल्यपूर्वक तपास करून लीलाराम तसेच चुन्नीलाल ऊर्फ सुमत प्रजापती (३५, रा. नाडीयावाड, सुरत, मूळ रा. राजस्थान), जैसाराम ऊर्फ जेडी कलब ( ३२, मुंबई, मूळ रा. राजस्थान), दोनाराम ऊर्फ दिलीप पराडिया, (२४, रा. सुरत, गुजरात, मूळ रा. पहाडपुरा, राजस्थान ) आणि नागजीराम मेघवाल (२९, रा. नाडीयावाड, मूळ रा. राजस्थान) या पाचजणांच्या टोळीला २१ डिसेंबर रोजी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीतील सर्व दागिन्यांसह मुद्देमाल हस्तगत केला. त्यांना ठाणे न्यायालयाने २६ डिसेंबरपर्यंत पाेलिस काेठडी दिली. आरोपींवर सुरतमध्येही चोरीचे दोन गुन्हे यापूर्वी दाखल आहेत.
अशी आहे एमओबी
दुकानात चोरी करण्यापूर्वी आधी रेकी करून बाजूच्या दुकानात गाळा भाड्याने घेऊन दुकानाला भगदाड पाडले. चोरी करण्याची या टोळीची एमओबी आहे. नौपाड्यात त्यांनी आधी काही दिवसांपूर्वी टेहळणी केल्याचे उघड झाले.
अशी केली अटक-
सीसीटीव्हीमध्ये दोघांचे फुटेज पोलिसांना मिळाले होते. त्याच आधारे दुकान ते ठाणे रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशन ते थेट गुजरातमधील १० ते १२ रेल्वे स्थानकातील फुटेजची तपासणी केली. याच पडताळणीमध्ये हा गुन्हा उघड झाला.