महापौरांकडून रस्ते कामांची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 00:31 IST2019-12-08T00:30:38+5:302019-12-08T00:31:00+5:30
शहरातील रस्त्यांकडे लक्ष देण्याची विनंती महापौर प्रतिभा पाटील यांच्याकडे शहरवासीयांनी केली होती.

महापौरांकडून रस्ते कामांची पाहणी
भिवंडी : शहरातील रस्त्यांकडे लक्ष देण्याची विनंती महापौर प्रतिभा पाटील यांच्याकडे शहरवासीयांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर पदभार स्वीकारताच २४ तासांतच त्यांनी शुक्रवारी सायंकाळी कोंबडपाडा परिसरात सुरू असलेल्या रस्तेकामांची पाहणी केली. त्यानंतर, बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना बोलावून दर्जेदार रस्ते तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच अधिकारी आणि ठेकेदारांची कानउघाडणीही केली.
विविध भागांतील रस्त्यांच्या निकृष्ट कामांमुळे रस्त्यांची वारंवार दुरवस्था झाली आहे. त्यामुळे मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावर वाहतूककोंडीची समस्या गंभीर बनली आहे. कल्याण रोड, कणेरी, समदनगर, पद्मानगर, नवी चाळ, तीनबत्ती, अशोकनगर, आसबीबी, नवी वस्ती, कोटरगेट, कासारआळी, निजामपुरा, कामतघर रोड, शांतीनगर, गैबीनगर, राजीव गांधी चौक आदी मुख्य भागातील रस्त्यांसह शहरातील संपूर्ण रस्त्यांची चाळण झाली आहे. महापौरांनी महापालिकेचे शहर अभियंता एल.पी. गायकवाड व अधिकाऱ्यांशी रस्तेदुरुस्तीबाबत चर्चा करून तातडीने रस्तेदुरु स्ती करण्याचे आदेश दिले आहेत.