ठाण्यात मेट्रोसाठी रातोरात केली झाडांची अमानुष कत्तल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 02:22 AM2019-11-29T02:22:31+5:302019-11-29T02:22:47+5:30

मुंबईत मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमधील वृक्षांची कत्तल केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता ठाण्यातही तीनहातनाका परिसरात मध्यरात्री २ च्या सुमारास मेट्रो-४ च्या कामासाठी वृक्षांची कत्तल केली जात असल्याची बाब समोर आली.

Inhuman slaughter of trees made overnight in Thane Metro | ठाण्यात मेट्रोसाठी रातोरात केली झाडांची अमानुष कत्तल

ठाण्यात मेट्रोसाठी रातोरात केली झाडांची अमानुष कत्तल

googlenewsNext

ठाणे : मुंबईत मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमधील वृक्षांची कत्तल केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता ठाण्यातही तीनहातनाका परिसरात मध्यरात्री २ च्या सुमारास मेट्रो-४ च्या कामासाठी वृक्षांची कत्तल केली जात असल्याची बाब समोर आली. यानंतर, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही कत्तल तूर्तास थांबविली आहे. मात्र, या वृक्षतोडीला परवानगी होती का? न्यायालयाने स्थगिती उठविली होती का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. मेट्रो प्रकल्पासाठी झाडे तोडण्यासंदर्भात दाखल याचिकेवरील स्थगिती उठवली असल्यानेच फांद्या तोडल्या असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले असले, तरी पर्यावरणासाठी झाडे तोडू देणार नाही, असा पवित्रा मनसे आणि म्युज संस्थेने घेतला असल्याने भविष्यात मेट्रोसाठी वृक्षतोड करण्यासंदर्भातील प्रकरण अधिक तापण्याची चिन्हे आहेत.

वडाळा ते कासारवडवली या मेट्रो-४ च्या प्रकल्पाचे काम ठाण्यात जोमाने सुरू असून तीनहातनाक्यावर मेट्रोचे स्टेशन येणार आहे. या प्रकल्पाच्या आड येणाऱ्या झाडांची यासाठी कत्तल केली जाणार आहे. मात्र, पर्यावरणाची हानी यामुळे होऊ नये, यासाठी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यानंतर, मेट्रोसाठी झाडांची कत्तल करण्यास न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र, ती २५ तारखेला उठवल्यानंतर काही दिवसांपूर्वी आरे कॉलनीत मध्यरात्री जो झाडे तोडण्याचा प्रकार घडला, त्याच प्रकाराची पुनरावृत्ती बुधवारी मध्यरात्री ठाण्यातील तीनहातनाका परिसरात घडला. रात्री २ च्या सुमारास या परिसरातील काही झाडांच्या फांद्या तोडण्याचा प्रकार होत असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना मिळाली. त्यानंतर ते आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी दाखल झाल्यानंतर हा सर्व प्रकार आपण थांबवला असल्याची माहिती त्यांनी दिली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार होत असताना एमएमआरडीएचा कोणीही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नसल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे रात्री हा सर्व प्रकार झाल्यानंतर दुपारी म्युज संस्थेने लुईसवाडी येथील सर्व्हिस रोड परिसरात निदर्शने करण्यात आली. म्युज संस्थेचे नितीन बंगेरा यांनी हे आंदोलन केले असून यावेळी त्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशीदेखील चर्चा केली. ठाण्यात मेट्रोसाठी जवळपास १०२३ झाडांची कत्तल केली जाणार आहे.

हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे म्यूज संस्थेचे नितीन बंगेरा यांनी स्पष्ट केले असून याला मनसेचेदेखील पाठबळ मिळणार असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितल्याने मेट्रोच्या वृक्षतोडीचा मुद्दा आणखी तापण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे यासंदर्भात एमएमआरडीएच्या संबंधित अधिकाºयांशी संपर्क साधला असता त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली आहे. बुधवारी मध्यरात्री कोणत्याही प्रकारची वृक्षतोड केली नसून केवळ झाडांच्या फांद्या कापल्या असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे वृक्षतोड झाली हे वृत्त खोटे आहे. या प्रकल्पासाठी वृक्षतोडीवरील स्थगिती उठवली असून यासंदर्भातील सर्व प्रकारच्या परवानग्या घेतल्या आहेत. त्यामुळे हे सर्व कामकाज नियमानुसारच सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.

अवमान याचिका दाखल करणार
मेट्रोसंदर्भात दोन याचिका दाखल असून एका याचिकेमध्ये मेट्रो प्रकल्पासाठी भूमिगत मेट्रोचा पर्याय असताना एलिव्हेटेड मेट्रोसाठी वृक्षतोड करू नये, अशी मागणी केली होती. २५ नोव्हेंबरला यासंदर्भात न्यायालयात स्थगिती उठवण्यात आली असली, तरी दुसºया याचिकेमध्ये ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने तीन हजार ६०० झाडे तोडण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्याला न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर, यासंदर्भात ३ डिसेंबरला सुनावणी होणार असून तोपर्यंत शहरातील एकही झाड तोडू नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे यासंदर्भात अवमान याचिका दाखल करणार असून जनआंदोलनदेखील उभे केले जाणार आहे . - रोहित जोशी, याचिकाकर्ते

सुनावणी घेतलीच नाही : मेट्रो प्रकल्पासाठी झाडांची कत्तल करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने परवानगी देताना सूचना आणि हरकतींसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यावेळीच आम्ही मेट्रोला जर भूमिगत करण्याचा पर्याय उपलब्ध असेल तर ती भूमिगत करून झाडे तोडू नये, अशी हरकत घेतली होती. मात्र, आमच्या हरकतीवर ठाणे महापालिकेने सुनावणी घेतली नाही. वारंवार विचारणा करूनही एकाही अधिकाºयांनी सुनावणी घेतली नसल्याने आता यासंदर्भांत आंदोलन करण्यात येणार आहे. - नितीन बंगेरा, म्यूज संस्था

रात्री झाडे तोडण्याची गरजच काय? : मेट्रो प्रकल्पासाठी वृक्षतोडीच्या प्रस्तावावर स्थगिती उठली असली, तरी मध्यरात्री अशा प्रकारे झाडे तोडण्याचा हा काय प्रकार आहे. एवढ्या रात्रीत झाडे तोडण्याची आवश्यकताच काय आहे. सर्वांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. झाडे वाचवण्यासाठी आंदोलन करत आहेत, त्यांच्या पाठीशी मनसे उभी राहील. - अविनाश जाधव, जिल्हाध्यक्ष, मनसे

Web Title: Inhuman slaughter of trees made overnight in Thane Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.