मध्य रेल्वेला इंद्रायणी, सिंहगड, तपोवन एक्स्प्रेसचे वावडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:26 IST2021-06-29T04:26:55+5:302021-06-29T04:26:55+5:30
अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : गतवर्षी २२ मार्चपासून भारतीय रेल्वेसेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. दुसऱ्या ...

मध्य रेल्वेला इंद्रायणी, सिंहगड, तपोवन एक्स्प्रेसचे वावडेच
अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : गतवर्षी २२ मार्चपासून भारतीय रेल्वेसेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. दुसऱ्या अनलॉकनंतर काही प्रमाणात लांबपल्ल्याच्या रेल्वे सुरू झाल्या आहेत; मात्र अनेक महत्त्वाच्या रेल्वेगाड्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत.
विशेषतः मुंबई-पुणे-मुंबई मार्गावर इंद्रायणी, सिंहगड, सिद्धेश्वर तसेच मुंबई-नाशिक-मनमाड मार्गावर तपोवन, राज्यराणी या काहीशा कमी अंतराच्या, पण मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, जळगाव या जिल्ह्यांसाठी महत्त्वाच्या रेल्वेगाड्या आहेत. मनमाड, नाशिक, पुणे येथून अनेक चाकरमानी, व्यापारी त्या गाड्यांतून अप-डाऊन करून नाेकरी-व्यवसाय करतात. त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे; मात्र या गाड्या सुरू नसल्याने हजारो प्रवाशांची गैरसोय झाली आहे. वर्ष झाले असून या गाड्या बंद आहेत. त्या तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या गाड्या सुरू केल्यास सध्या सुरू असलेल्या लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांवरील ताण कमी हाेण्यास मदत हाेईल. शासनाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा. तसेच यामुळे सर्व जिल्ह्यांतील जनजीवन सुरळीत हाेण्यासही हातभार लागेल, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
सध्या सुरू असलेल्या गाड्या
- डेक्कन एक्स्प्रेस
- डेक्कन क्वीन
- पंचवटी एक्स्प्रेस
- सिद्धेश्वर एक्स्प्रेस (१ जुलैपासून प्रस्तावित)
- चेन्नई एक्स्प्रेस
- हैदराबाद एक्स्प्रेस
- यूपीला जाणाऱ्या गाड्या
या गाड्या कधी सुरू होणार?
- तपोवन एक्स्प्रेस
- राज्यराणी एक्स्प्रेस
- इंद्रायणी एक्स्प्रेस
- सिंहगड एक्स्प्रेस
- कोयना एक्स्प्रेस
- सह्याद्री एक्स्प्रेस
-------------------
या पॅसेंजर गाड्यांचे घोडे कोठे अडले?
- भुसावळ पॅसेंजर
- दादर-रत्नागिरी पॅसेंजर
- दिवा-सावंतवाडी पॅसेंजर
- एलटीटी-साईनगर शिर्डी फास्ट पॅसेंजर
- एलटीटी-पंढरपूर फास्ट पॅसेंजर
-----------------------
मुंबई-पुणे तसेच मुंबई-नाशिक मार्गावर हजारो प्रवासी हे वर्षानुवर्षे शॉर्टरूट गाड्यांमधून प्रवास करतात, सकाळी मुंबईत यायचे, संध्याकाळी परत जायचे. त्यात शासकीय, निमशासकीय, व्यापारी आदींचा समावेश असतो. त्यामुळे या गाड्या तत्काळ सुरू करणे गरजेचे आहे. त्यातून ठाणे, नाशिक, पुणे, रायगड, मुंबई आदी नजीकच्या जिल्ह्यातील चाकरमान्यांचे हाल सुरू आहेत, ते कमी होतील. राज्य शासन, रेल्वे प्रशासनाने तातडीने हा निर्णय घेऊन सामान्यांना दिलासा द्यावा.
- नितीन परमार, कर्जत प्रवासी संघटनेचे पदाधिकारी.
------------------
पॅसेंजर सुरू कराव्यात ही प्रमुख मागणी आहे. पण त्यासोबतच शॉर्टरुटच्या गाड्या तातडीने सुरू कराव्यात. जेणेकरून लांबून येणाऱ्या गाड्यांत गर्दी होणार नाही. तसेच लांबच्या गाडीतील स्वच्छतेवर ताण पडणार नाही. नजीकच्या सर्व जिल्ह्यांतील नागरिकांना दिलासा मिळून हळूहळू सर्व व्यवहार सुरळीत होण्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचे पाऊल ठरेल.
- मनोहर शेलार, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे संस्थापक