इंदिरानगर सर्वात बकाल वॉर्ड

By Admin | Updated: September 29, 2015 01:16 IST2015-09-29T01:16:25+5:302015-09-29T01:16:25+5:30

एकीकडे केडीएमसी महापौर-आयुक्त स्मार्ट सिटीची स्वप्ने बघत असताना या शहरांमधील बकाल अवस्था कधी दूर होणार, आम्हाला मोकळा श्वास कधी घ्यायला मिळणार

Indiranagar is the oldest ward | इंदिरानगर सर्वात बकाल वॉर्ड

इंदिरानगर सर्वात बकाल वॉर्ड

अनिकेत घमंडी, डोंबिवली
एकीकडे केडीएमसी महापौर-आयुक्त स्मार्ट सिटीची स्वप्ने बघत असताना या शहरांमधील बकाल अवस्था कधी दूर होणार, आम्हाला मोकळा श्वास कधी घ्यायला मिळणार, असा सवाल इंदिरानगरमधील रहिवासी करीत आहेत. आधीच परिस्थितीने ग्रासलेले असतानाच महापालिकेनेही काणाडोळा केल्याने या ठिकाणी राहणे तर सोडाच, परंतु श्वास घेणेही अवघड झाले आहे. तशाच घुसमटीत हजारो रहिवासी वास्तव्यास आहेत. या ठिकाणी गेले की, आपण महापालिकेत आहोत की कोण्या पाड्यावर, अशी प्रचंड घाण अवस्था आहे. त्यातच नगरसेवक सत्ताधारी नाही, त्यामुळे केवळ गटारी, पायवाटा त्याही अर्धवट करण्यापलीकडे एकही विकासकाम झालेले नाही.
समाजमंदिरातच महापालिकाही बालवाडीचे धडे विद्यार्थ्यांना देत आहे. उघडी गटारे, दरवाजातच कपडे धुणे, भांडी घासणे, अशा अवस्थेत येथील रहिवासी जीवन जगत आहेत. तुटपुंज्या नगरसेवक निधीतून जेवढे काम करता येईल, तेवढे करण्याचा केविलवाणा प्रयत्न नगरसेवकाने केला. हजारोंच्या लोकसंख्येला या ठिकाणी केवळ दोन स्वच्छतागृहे आहेत. त्यांची अवस्था दयनीय असून त्या ठिकाणच्या नागरिकांमुळेच अशी बकाल अवस्था असल्याचे नगरसेवक व कार्यकर्ते सांगतात.
लहान मुले तशा घाणीतच खेळत असल्याने त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेत कचराकुंडीमुक्त वॉर्ड करण्यासाठी नगरसेवकांमध्ये स्पर्धा लागली आहे. त्या स्पर्धेत येथील नगरसेवकाची गणतीच नाही, एवढा भयंकर कचऱ्याचा प्रश्न येथे आहे. महापालिकेतील स्लम एरिया ओळखला जाणारा हा वॉर्ड असून एकही विकासाची योजना येथे आलेली नाही. आघाडी सरकारच्या दोन्ही ठिकाणच्या सत्तेत त्यांच्या नगरसेवकांनी विशेष निधी आणून केडीएमसीत स्वत:चे वॉर्ड राखण्याचा प्रयत्न केला. येथील नगरसेवकाला मात्र तेही न जमल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
नागमोड्या आणि छोट्या गल्ल्यांमधून मार्ग काढताना एखाद्या नवख्या माणसाला भय वाटावे आणि त्यातच दुर्गंधी, गैरसोय बघून भोवळ यावी, अशी अवस्था आहे. बहुतांशी गटारांमध्ये पाणी तुंबलेले असून त्याच ठिकाणी रहिवासी कचरा, अन्न टाकतात. त्यामुळेही घाण, उग्र दर्प येत आहे. साधा रस्ता नाही. रंगीबेरंगी लाद्या-पेव्हरब्लॉक लावून पायवाटेला आकार देण्याचा प्रयत्न असून बहुतांशी ठिकाणी त्या ओबडधोबड झाल्याने वाट काढताना अडचण होते. बाजूचाच पेंडसेनगर वॉर्ड हा आयएसओ होण्याचे वेध लागले असतानाच या वॉर्डात नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अवघ्या हाकेच्या अंतरावर एमआयडीसी आहे, परंतु तरीही बेरोजगारीची गंभीर समस्या आहे.
शेकडो युवक असून त्यांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्या भवितव्याचाही प्रश्न आहेच. सुशिक्षितांची डोंबिवली म्हणवताना हा भाग कसा काय वंचित राहिला, येथे विकासाची गंगा का वाहिली नाही. कोणत्याही खासदार, आमदारासह महापौर, उपमहापौर, आजी-माजी नगरसेवकांनी या ठिकाणी विकास योजना का आणल्या नाहीत? केवळ मतांसाठीच या रहिवाशांना गृहीत धरताना राजकारण्यांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा विचार का केला नाही? केवळ स्लम म्हणून दुर्लक्षित का ठेवण्यात आले? आदी सवाल उपस्थित होत आहेत.

Web Title: Indiranagar is the oldest ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.