वाचनातून शब्दभांडार वाढवा; चांगले शब्द वापरले तरच मराठी भाषा जगेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 00:36 IST2020-01-13T00:36:19+5:302020-01-13T00:36:31+5:30
अश्विनी शेंडे यांचे मत : मकरोत्सवामध्ये रंगला ‘शब्दांचा कॅफे’

वाचनातून शब्दभांडार वाढवा; चांगले शब्द वापरले तरच मराठी भाषा जगेल!
डोंबिवली : गीत लिहिताना सर्वसामान्यांना समजतील, असे सोपे शब्द वापरण्याचा आग्रह धरला जातो. मात्र, मराठी भाषेत मोठे शब्दसामर्थ्य आहे. त्यातील चांगले शब्द वापरले तरच मराठी भाषा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल. हे शब्दच वापरले नाहीत, तर मराठी भाषा टिकणार कशी? त्यामुळे हे शब्द वापरले पाहिजेत. मराठी भाषा जगली तरच मराठी शाळा तग धरतील, असे मत सुप्रसिद्ध गीतकार व लेखिका अश्विनी शेंडे यांनी व्यक्त केले.
टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी झालेल्या मकरोत्सव कार्यक्रमांतर्गत ‘शब्दांचा कॅफे’मध्ये शेंडे बोलत होत्या. यंदाचे महोत्सवाचे दुसरे वर्ष होते. टिळकनगर शाळेच्या पटांगणावर हा कार्यक्रम पार पडला. अनेक मालिकांची शीर्षकगीते, चित्रपटांची शीर्षकगीते, पथकथा व संवाद लिखाण करणाऱ्या अश्विनी शेंडे यांच्याशी अभिनेते अभिजित खांडकेकर यांनी संवाद साधला. यावेळी मालिकांची शीर्षकगीते आणि गाणी जयदीप बगवाडकर आणि योगिता गोडबोले यांनी सादर केली. संस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते.
शेंडे म्हणाल्या की, प्रेक्षकांच्या मनाला साधेपणा जास्त भावतो. पण, सारखे साधे लिहिले तर चांगले मराठी शब्द कसे कळणार? सतत सोपे लिहून आपणच आपल्या भाषेचा दर्जा कमी करत आहोत. ‘लोकमत सखी मंच’च्या एका कार्यक्रमात एक बाई आपल्या मुलीला घेऊन आली. त्यांनी तुमच्या गीतातील काही शब्द कठीण वाटतात, असे सांगितले. त्यांनी ‘कवडसा’ या शब्दाचा अर्थ कवड्या असा लावला. मग, त्या मुलीला आणि तिच्या आईला कवडसाचा अर्थ समजून सांगितला. हा शब्द वापरला नसता तर त्यांना समजला नसता. नवीन पिढीला ते शब्द समजावेत, यासाठी त्यांचा वापर केला पाहिजे. मालिकेचे शीर्षकगीत लिहिताना त्यात त्या शीर्षकाचा शब्द असावा, असा आग्रह असतो. त्यामागे प्रेक्षकांना कोणती मालिका सुरू आहे, हे कळावे, हा उद्देश असतो. वेगळ्या विषयांवरील मालिकांची शीर्षकगीते लिहिण्याची संधी मिळाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या क्षेत्रात मी गुलजार यांना आपला गुरू मानते, असेही त्यांनी सांगितले. ते जुन्या कल्पना नवीन स्वरूपात मांडतात. त्यामुळे त्यांचे गीत किंवा कविता मनाला भिडते. केवळ रोमॅण्टिक गाणी लिहितो, असा शिक्का बसू नये, यासाठी वेगवेगळ्या प्रकारे लिखाण करण्याचा प्रयत्न केला. त्यात पंढरीची वारी आणि विशेष मुलांची वारी या दोन्हींचा वापर केलेले ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हो’ हे गीत तयार केले, असे त्यांनी सांगितले.
गुलजार यांच्या गीतांवर आधारित नवीन कार्यक्रम घेऊन येत असल्याचे बगवाडकर यांनी सांगितले. त्यानंतर, त्याची झलक ही गायकांनी दाखवली. ‘मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना’ आणि ‘आप की आँखों में कुछ महके हुए से राज है’ ही दोन गाणी सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.