मुंब्रा : कंटेनरने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. हे तरुण एकाच दुचाकीवर बसून घरातून निघताच, पुढच्या अवघ्या पाच मिनिटांमध्ये अपघात झाला. तिघांपैकी कुणीही हेल्मेट घातले नव्हते, हे विशेष.
मुंब्रा बायपास रस्त्यावरुन दुचाकीवरून तिघे दुपारी तीनच्या सुमारास ठाण्याहून शिळफाट्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरून चालले होते. त्यावेळी कंटेनरला दुचाकीला मागून धडक दिली. यामुळे चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटल्यामुळे तिघे खाली पडले. त्याच वेळी त्यांच्या अंगावरून कंंटेनरचा मागचा टायर गेल्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला. हसन अक्रम शेख (१९), मोहिनउद्दीन मोहम्मद खुशीशेख (१९), अफजल साकुर शेख(२२) अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. खड्ड्यांमुळे अपघात झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
खड्ड्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू
खड्ड्यांमुळे बळी जाण्याचे सत्र सुरूच आहे. विरार रस्त्यावरील भाटपाडा येथील आरटीओ कार्यालयासमोर पडलेल्या खड्ड्यामुळे दुचाकीस्वाराचा टँकरखाली आल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी घडली. प्रताप नाईक (५५) असे मृताचे नाव आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी प्रताप हा देवीच्या मूर्तीसाठी पाट घेऊन विरार फाट्याच्या दिशेने दुचाकीवरून जात होता. दहा वाजता विरारच्या आरटीओ कार्यालयासमोरील खड्ड्यांचा त्यांना अंदाज न आल्याने ते दुचाकीसह घसरले आणि टॅंकरखाली चिरडले गेले.
पाेलिस, पालिकेविराेधात ग्रामस्थांचा रास्ता राेकाे अपघाताच्या घटनेनंतर येथील ग्रामस्थ व नागरिक प्रचंड संतापले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत येथील वाहतूक पोलिस व महापालिका अधिकाऱ्यांविरोधात रास्ता रोको आंदोलन केले. वाहतूक पोलिस, पालिकेच्या भोंगळ कारभारामुळेच अपघाताच्या घटना घडत असल्याचा आरोप करण्यात आला. या अपघातानंतर विरार येथे प्रचंड वाहतूककोंडी झाल्याचे पाहावयास मिळाले.