गर्भपातावरील औषधांची बेकायदेशीर विक्री; तीन औषधविक्रेत्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 22:40 IST2019-02-08T22:40:35+5:302019-02-08T22:40:55+5:30
तिघा औषध विक्रेत्यांना अटक रामनगर पोलिसांची कारवाई

गर्भपातावरील औषधांची बेकायदेशीर विक्री; तीन औषधविक्रेत्यांना अटक
डोंबिवलीः गर्भपातावरील उपयुक्त औषधांची बेकायदेशीरपणे विक्री केल्याच्या आरोपाखाली तीन औषध विक्रेत्यांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे.
कल्पेश रामचंद्र कदम, आशिष कांताप्रसाद गुप्ता आणि पंकज टेकाराम रावळ अशी तिघा अटक औषध विक्रेत्यांची नावे आहेत. त्यांची डोंबिवली पुर्वेकडील भागात औषध विक्री ची दुकाने आहेत. रामनगर पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून कल्पेश कदम हा कुठलाही परवाना नसताना बेकायदेशीररित्या गर्भपातावरील औषधांची विक्री करतो अशी माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करता त्याच्याकडे १५ हजार रुपये किमतीची औषधे आढळून आली. त्याच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्याने ही औषध आशिष गुप्ता या औषध विक्रेत्याकडून घेतल्याचे समोर आले. गुप्ता यालाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने औषध विक्रेता पंकज रावळ याचे नाव उघड केले.
दरम्यान या औषधांची विक्री करताना औषध व प्रशासन सौंदर्य प्रसाधने विभागाची परवानगी लागते तसेच डॉक्टरच्या चिठ्ठी शिवाय या औषधांची विक्री करता येत नाही. परंतु या तिघा औषध विक्रेत्यांकडे कोणताही परवाना नसल्याचे तपासात समोर आले असून तिघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह पवार यांनी दिली.