बेकायदा रिक्षाचालकांचा भिवंडीत उच्छाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 01:13 IST2021-03-01T01:13:03+5:302021-03-01T01:13:14+5:30
दुप्पट भाडेवाढीने प्रवाशांचा खिसा रिकामा : सामान्यांची लूट

बेकायदा रिक्षाचालकांचा भिवंडीत उच्छाद
- नितीन पंडित
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : अनलाॅकमध्ये रिक्षांना काही बंधने घालून परवानगी देण्यात आली. मात्र, रिक्षाचालकांनी बंधने धुडकावून बेशिस्त वर्तनाचेच दर्शन घडवले आहे. काेराेना काळातील कसर भरून काढण्याचा चंग बांधून या रिक्षाचालकांनी सर्वसामान्य जनतेची लूट चालवली आहे. शहर आणि ग्रामीण भागात माेठ्या प्रमाणावर भाडेवाढ केली आहे. ग्रामीण भागात तर कहरच केला आहे. चार-पाच किमीच्या प्रवासासाठी प्रति माणसी १० वरून २० रुपये भाडेवाढ केली आहे. काही वेळा तर स्पेशल भाड्याच्या नावाखाली ८० ते १०० रुपये उकळले जात आहेत.
कोरोनामुळे रिक्षात कमी प्रवासी बसविण्यात यावे असे निर्देश आहेत. मात्र भिवंडी शहर व ग्रामीण भागात चार प्रवासी आल्याशिवाय रिक्षा हलतच नाही. भिवंडीत जवळपास सर्वच रिक्षा सीएनजीवर चालतात. मात्र, पेट्रोल-डिझेल दरवाढीची बाब पुढे करून भिवंडीत रिक्षाचालकांकडून स्वयंघोषित भाडेवाढ प्रवाशांवर लादली आहे. भिवंडी ग्रामीण भागातील अंजुरफाटा ते वडघर डुंगे खारबाव हा चार ते पाच किलोमीटरचा प्रवास आहे. यासाठी प्रवाशांना २० रुपये मोजावे लागतात. शहरात अंजुरफाटा ते वंजारपट्टी नाका या सहा ते सात किलोमीटरच्या अंतरासाठी तीस रुपये माणसी मोजावे लागतात.
काही दिवसांपूर्वी अंजुरफाटा येथून पायी जाताना एका रिक्षाचालकाने बेदरकारपणे धडक दिली. हा रिक्षाचालक मदत करण्याऐवजी मुजोरीने वागला आणि जखमी अवस्थेत मला साेडून पळून गेला. रुग्णालयात उपचार घेताना पोलीस जबाबासाठी आले. पण त्यांनीही कारवाई केली नाही.
- कविता जाधव-उबाळे, पूर्णागाव
रिक्षा स्टॅंण्डवर २० ते २५ रिक्षा थांबण्याची परवानगी असते. शहरात २० ते २५ स्टॅण्ड आहेत. त्यामुळे हजारांच्या आतच अधिकृत रिक्षा असतील. मात्र शहरात पाच हजारहून अधिक रिक्षा रस्त्यावर धावत आहेत. त्या कोठेही उभ्या केल्या जात असल्याने कोंडीही वाढली आहे.
- कल्याणजी घेटे, वाहतूक पोलीस निरीक्षक, नारपोली अंजुरफाटा शाखा