Illegal filing on the reservation plot of the bus station | बसस्थानकाच्या राखीव भूखंडावर बेकायदा भराव

बसस्थानकाच्या राखीव भूखंडावर बेकायदा भराव

भाईंदर: एसटी, एमबीएमटी, बेस्टच्या प्रवाशांना भरउन्हापावसात बससाठी रस्त्यावर थांबावे लागत आहे. त्याचवेळी भार्इंदर पश्चिमेला असलेल्या एसटी डेपो व बसस्थानकासाठी राखीव असलेल्या भूखंडावर बेकायदा भराव आणि खाजगी गाड्यांचे अतिक्रमण सुरूच आहे. महापालिकेचा रखवालदार आणि एसटीने लावलेला फलक कूचकामी ठरले आहेत. त्यामुळे हा प्रकार एसटी व पालिकेच्या संगनमताने सुरू असल्याचे आरोप करण्यात येत आहेत.

भार्इंदर पश्चिमेस रेल्वेस्थानकाबाहेरून एसटी, एमबीएमटी व बेस्टच्या बस येजा करतात. येथील एसटीच्या जुन्या चौकीची दुरवस्था झाली असून प्रवाशांना थांबण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. येथील बसथांब्यांवरही बेकायदा रिक्षांचे अतिक्रमण असते. बस उभ्या करणे, वळवणे आदीसाठी मोठ्या बसडेपो आणि सुविधांची प्रवाशांना गरज आहे.

रेल्वेस्थानकापासून हाकेच्या अंतरावरच एसटी डेपोसाठी भूखंड राखीव ठेवलेला आहे. पण हा भूखंड सीआरझेडमध्ये मोडत असून निम्म्यापेक्षा जास्त जागेत कांदळवन आहे. या जागेला कुंपणभिंत घातलेली आहे. तर कांदळवन सोडून अन्य जागेत बेकायदा भराव सुरू आहे. मासळीचे घाऊक विक्रेतेही त्यांचे थर्माकोल आदी कचरा याच कांदळवनात टाकत आहेत. भराव झालेल्या जागेत एसटी, एमबीएमटी स्थानक सुरू केले जात नसले, तरी खाजगी बस, टेम्पो, रिक्षा आदी वाहनांनी अतिक्रमण करून तळ ठोकला आहे. येथे सर्रास गॅस सिलिंडर ट्रकमध्ये भरले जातात. खाजगी लोक आणि व्यावसायिकांना तर वाहने उभी करण्याची फुकटची सोय झालेली आहे. खाजगी वाहनांच्या अतिक्रमणावरून एसटी आणि पालिकेवर टीकेची झोड उठल्यानंतर या भूखंडाच्या प्रवेशद्वारावर एसटीने दोन फलक लावले आहेत. ही जागा राज्य परिवहन महामंडळाची असून खाजगी वाहने उभी केल्यास पोलीस कारवाईचा इशारा दिलेला आहे. तर महापालिकेने त्यांच्या ठेक्यातील सुरक्षारक्षक तैनात केला आहे. मात्र, तो बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. ठेकेदारामार्फत ठेवलेला रखवालदार खाजगी वाहनांची बेकायदा पार्किंग रोखत नसेल तर सामान्य विभागास कारवाई करण्यास सांगू, असे महापालिका शहर अभियंता शिवाजी बारकुंड यांनी सांगितले.

सुरक्षारक्षक असताना गाड्या उभ्या कशा राहतात?
हप्ते घेऊन याठिकाणी खाजगी वाहने उभी करू दिली जात असल्याचे आपण सतत सांगत आहोत. पालिकेने सुरक्षारक्षक ठेवूनही खाजगी गाड्या कशा उभ्या राहतात, असा सवाल स्थानिक नगरसेविका रिटा शाह यांनी केला आहे. महापालिका आणि एसटीचे अधिकारी-कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत.
याठिकाणी असलेले लोखंडी प्रवेशद्वार दुरुस्त करून रखवालदारामार्फत केवळ एसटी, पालिका बससाठी खुले केल्यास येथील बेकायदा पार्किंगसह चालणारे अन्य गैरप्रकार रोखता येतील. याठिकाणी त्वरित बसस्थानक सुरू करावे, असे शाह म्हणाल्या.

Web Title: Illegal filing on the reservation plot of the bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.