जीवनात यशाचे शिखर गाठायचे असेल तर मेहनत हवीच- डॉ. लकी कासट
By नितीन पंडित | Updated: March 9, 2024 15:22 IST2024-03-09T15:22:41+5:302024-03-09T15:22:59+5:30
आपण इतरांना आपले ‘आयडॉल’ मानण्यापेक्षा असे काम करा की, तुम्ही इतरांसाठी ‘आयडॉल’ असले पाहिजे. महिलांनी एकमेकीना सहकार्याचा हात देऊन पुढे जायला पाहिजे.

जीवनात यशाचे शिखर गाठायचे असेल तर मेहनत हवीच- डॉ. लकी कासट
भिवंडी : जीवनात यशाचे शिखर सहजासहजी गाठता येत नाही, त्यासाठी प्रचंड मेहनत,जिद्द व हिम्मतीने ते शिखर सर करायचे असते. तुमची मेहनत आणि मनात जिद्द असेल तर हिमालय देखील तुम्ही जिंकू शकता.जिंकण्याची हि जिद्द महिलांकडे आहे, त्यासाठी लागणारे कष्ट त्या सहन करतात आणि यशस्वी होतात असे वक्तव्य प्रसिध्द बालरोग शल्यचिकीत्सक, मोटीवेशनल स्पिकर,व्याख्याते डॉ. लकी कासट यानी भिवंडीत केले.शुक्रवारी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून टोरंट पावर कंपनीच्या वतीने महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन अंजुरफाटा येथील ओसवाल महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते.यावेळी राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा विजेत्या डॉ.नम्रता श्रीवास्तव यांच्यासह टोरंट पावरचे अधिकारी कर्मचारी तसेच टोरंट पॉवर कंपनी परिवरातील ५०० हुन अधिक महिला कर्मचारी उपस्थित होत्या.
याकार्यक्रमाप्रसंगी डॉ. लकी कासट यानी जगातील विविध शिखरे पादाक्रांत केलेल्या सहा यशस्वी महिलांची उदाहरणे त्यांच्या संघर्षासह सादर करत यशाचे शिखर देखील असेच सुरूवातीला आपल्याला कठीण वाटते,मात्र एकदा का जिद्दीने प्लानिंग करून शिखर चढायला सुरूवात केली की, यश हे मिळणार असल्याचे विशद केले.तर राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा विजेत्या डॉ.नम्रता श्रीवास्तव यांनी महिला सशक्तीकरणाचे महत्व विषद करत महिला आता सर्व क्षेत्रात पुढे येत चालल्या आहेत, त्याना साथ देण्याची गरज आहे. समाजाने आता महिला म्हणजे अबला आहे असे मानण्याची गरज नसल्याचे सांगितले. आपण इतरांना आपले ‘आयडॉल’ मानण्यापेक्षा असे काम करा की, तुम्ही इतरांसाठी ‘आयडॉल’ असले पाहिजे. महिलांनी एकमेकीना सहकार्याचा हात देऊन पुढे जायला पाहिजे. आपले सुख आपण शोधली पाहिजे, इतराना खूष करत बसलात तर, तुम्ही कधी सुखी होऊ शकणार नाही, असेही डॉ. नम्रता श्रीवास्तव यानी यावेळी सांगितले.