तंत्रज्ञानामुळे जगणे बदलले तर गाणे ही बदलणारच - आशुतोष जावडेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 21:51 IST2017-10-02T21:51:16+5:302017-10-02T21:51:26+5:30
आपले जगणे तंत्रज्ञानामुळे इतके बदलले आहे तर गाणे ही बदलणारच. ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे. जुन्या काळातील संगीत हे चांगले होते. हे विधान मला पटत नाही.

तंत्रज्ञानामुळे जगणे बदलले तर गाणे ही बदलणारच - आशुतोष जावडेकर
ठाणे : आपले जगणे तंत्रज्ञानामुळे इतके बदलले आहे तर गाणे ही बदलणारच. ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे. जुन्या काळातील संगीत हे चांगले होते. हे विधान मला पटत नाही. आताच्या काळात अत्यंत सुमार ते आशयघन अशी गाणी आढळतात असे वक्तव्य लेखक आशुतोष जावडेकर यांनी ठाण्यात केले.
मॅजेस्टिक गप्पाचे शेवटचे पुष्प सोमवारी गुंफण्यात आले. सावरकर वाचनालय येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जावडेकर यांच्या सांगतिक गप्पांचा कार्यक्रम रंगला. सिद्धार्थ केळकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. आपल्या संगीत प्रवास उलगडताना जावडेकर म्हणाले की, मला गाण्याचे अंग उपजत होते. एकच अंग असते तर मी पं. आशुतोष जावडेकर असतो. माझ्या आत एक आशुतोष आहे, जो शब्दांचा लोभी आणि दुसरा आशुतोष आहे जो सुरांचा लोभी आहे. शब्द - स्वर हे दूरचे नातेवाईक नाहीत. उत्तम गाण्यासाठी जगण्याचा रियाज असावा लागतो. ते अनेक गायकांना नाही. ऐकणो हा पहिला रियाज असतो, मी ऐकत खूप गेलो. चांगले रसिक घडायचे असेल तर आपल्याला वाढायला लागेल. माझी ओळख ही वन लायनर आहे. गाणे कितीही तल्लीन होऊन ऐकत असलो तरी गाणे हे माझे सर्वस्व नाही. मी एक्सप्रेशनिस्ट आहे. संगीत ही सामाजिक घटना आहे. ती शुन्यातून निर्माण होत नाही. गाणो ही ऐकण्याबरोबर बघण्याची देखील गोष्ट आहे. हे भारतीयांना न पटण्यासारखे नाही. आपण गाणे हे पाहिलेले देखील असते. दृश्य कला आणि श्रवण कला या भगिनी आहेत. संगीत हे दृश्यकलेला आव्हान देणारे असते. इनडिपेण्डंट म्युझिकची जगभर लाट आहे. हे म्युझीक मराठीत आणावे. आपल्या मराठी संगीतात होणा-या चांगल्या गोष्टी या परभाषिकांर्पयत पोहोचाव्या. संगीत रसिक म्हणून आपल्या सांगितीक कक्षा विस्ताराव्या लागतील. अभिरुचितला फरक आपण जाणून घेतला पाहिजे. ज्यांना पाश्चात्य संगीत हे कर्णकटू वाटत असेल त्यांनी कंट्री संगीतापासून सुरूवात करावी. तुम्ही गायक असा किंवा नसा गात मात्र जा असा सल्ला त्यांनी दिला.