मानसिक आरोग्याबाबत जबाबदारी ओळखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 12:26 AM2021-01-11T00:26:36+5:302021-01-11T00:26:49+5:30

डॉ. शिल्पा आडारकर

Identify responsibility for mental health! | मानसिक आरोग्याबाबत जबाबदारी ओळखा!

मानसिक आरोग्याबाबत जबाबदारी ओळखा!

googlenewsNext

ठाणे : मानसिक आरोग्याचा पाया जितका बळकट तेवढा विषाणूचा, ताणतणावाचा जोर कमी होतो. या वर्षी मानसिक आरोग्य जपण्याचा संकल्प करू या. माझे कुटुंब, माझी जबाबदारीप्रमाणे माझे मानसिक आरोग्य, माझी जबाबदारी ओळखू या असा मोलाचा सल्ला केईएम रुग्णालयातील अधिव्याख्यात्या डाॅ. शिल्पा आडारकर यांनी दिला, तसेच २०२०ला नावे ठेवून चालणार नाही. २०२०ने दिलेली शिकवण विसरता कामा नये. २०२० ला गुरुस्थानी मानले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

सरस्वती सेकंडरी स्कूलच्या सभागृहात रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफताना ‘कोरोनानंतरची सद्य:स्थिती व मानसिक आरोग्य’ या विषयावर डॉ.आडारकर बोलत होत्या. त्यांनी २०२० या वर्षातील कोविड काळातील लॉकडाऊन ते अनलॉकपर्यंतच्या जनजीवनातील बऱ्या-वाईट बाबींचा ऊहापोह केला. कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम, लॉकडाऊनसारखे नवीन शब्द निर्माण झाले असे असले, तरी यामुळे सोशल मीडियासोबतच व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी फोफावल्याने अनेकांना स्वावलंबनाचे धडे, एकत्र कुटुंब पद्धती, पाक कौशल्याची अनुभूती घेता आली. या काळात एकमेकांना मदत करण्याच्या भावनेने अनेक दाते निर्माण झाले. जगण्यासाठी कमीतकमी गोष्टींची गरज भासते, हे या काळाने शिकविले. मात्र, त्याचबराेबरीने अत्याचार, बाललैंगिक छळ, घटस्फोटाची प्रकरणे वाढली, सोशल डिस्टन्सिंग पाळण्यामुळे एकटेपणाची भावना वाढून ज्येष्ठांत नैराश्याची भावना, मुलांत आक्रमकता, तर तरुणाईत उदासीनता पसरल्याचे त्या म्हणाल्या.

‘प्रत्येकाने दीर्घ श्वसनाची सवय लावा’
लॉकडाऊनमध्ये घरूनच काम केल्याने सतत स्क्रिनसमोर राहिल्याने स्थूलता वाढण्याबरोबरच झोपेच्या, डोळ्यांच्या आणि इतर शारीरिक व्याधींच्या तक्रारी वाढल्या. असे असले, तरी २०२० या वर्षात वेळेचे नियोजन, स्वच्छता, मास्कचा नियमित वापर आणि संतुलित आहाराची सवय लागल्याने आरोग्यावर सकारात्मक परिणाम झाला. अनलॉकनंतर काहींच्या बेजबाबदारपणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येकाने दीर्घ श्वसनाची सवय लावून घेणे आरोग्यदायी ठरेल, असा कानमंत्रही त्यांनी दिला.

Web Title: Identify responsibility for mental health!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे