"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
By अजित मांडके | Updated: April 30, 2025 15:25 IST2025-04-30T14:16:43+5:302025-04-30T15:25:29+5:30
मी मुख्यमंत्री असतानाही पंढरपुरात चार वेळा पूजा केली होती असं शरद पवार यांनी म्हटलं.

"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
ठाणे : काही लोक असे म्हणतात की मी अशा कार्यक्रमाला जात नाही. परंतु ते अर्ध सत्य आहे. त्यांना आज कदाचित उत्तर मिळाले असेल. मी लहान असल्यापासून कित्येक पूजा केलेल्या आहेत, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी अप्रत्यक्षरित्या मनसेचे राज ठाकरे यांना टोला लगावला. मी मुख्यमंत्री असतानाही पंढरपुरात चार वेळा पूजा केली असल्याचही त्यांनी सांगितले.
पाचपाखाडी भागात उभारण्यात आलेल्या तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जंयत पाटील, खासदार सुरेश म्हात्रे, उद्धव सेनेचे मिलिंद नार्वेकर, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह शहरातील शेकडो लोकांनी या सोहळ्याला हजेरी लावली.
मी आज मोठ्या श्रध्देने सहपरिवार पूजा केली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पवित्र कामात राजकीय प्रश्न आणू नका अशी विनंतही त्यांनी यावेळी केली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चेविषयी पवार यांना छेडले असता, दोन कुटुंब एकत्र आली तर आम्हाला आनंदच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पहलमगावर झालेल्या हल्याच्या अनुषगांने टीका केली गेली आहे. परंतु हा टीकेचा विषय आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पहलगाम हल्यानंतर आता विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी काँग्रेसने केली असून त्याला आमचा पाठींबा असल्याचे सांगत लवकरात लवकर हे अधिवेशन बोलवावे असेही त्यांनी सांगितले. तसेच जो हल्ला झालेला त्यानंतर आता पाकीस्तानला उत्तर देणे गरजेचे असून पंतप्रधान जे निर्णय घेतील त्या सोबत आम्ही असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हा हल्ला केवळ त्या लोकांवर नाही तर हा देशावरील हल्ला असल्याचेही त्यांनी सांगितले.