उल्हासनगर शेजारील वरपगावात चारित्राच्या संशयातून पत्नीची हत्या करून पतीचा आत्महत्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 20:52 IST2025-11-07T20:51:34+5:302025-11-07T20:52:37+5:30
उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या पती पत्नीला उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान पत्नी विद्या हिचा मृत्यू झाला, तर संतोषची प्रकृती चिंताजनक असून पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले.

उल्हासनगर शेजारील वरपगावात चारित्राच्या संशयातून पत्नीची हत्या करून पतीचा आत्महत्याचा प्रयत्न
सदानंद नाईक
उल्हासनगर : उल्हासनगर शेजारील वरप गावातील विश्वजीत प्रिअर्स सोसायटीत राहणाऱ्या संतोष पोहळ याने चरित्राच्या संशयातून पत्नीची गुरुवारी रात्री गळा चिरून हत्या केली. त्यानंतर चाकूने स्वतःवर वार करीत संतोषने आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात पतीवर हत्येचा गुन्हा दाखल झाला असून गंभीर जखमी झालेल्या संतोषवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उल्हासनगर शेजारील वरपगावातील विश्वजीत प्रिअर्स सोसायटीत संतोष पोहळ हा पत्नी विद्या आणि दोन मुलांसह राहत होता. संतोष हा ड्रायव्हर म्हणून काम करीत होता. तर पत्नी विद्या ही टाटा मोटर्समध्ये कामाला होती. त्यांच्यात काही दिवसांपासून चारित्र्याच्या संशयावरून सतत वाद सुरू होते. असे पोलीस तपासात उघड झाले. गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास राहत्या घरातच त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. संतप्त झालेल्या संतोषने रागाच्या भरात धारदार चाकूने पत्नीचा गळा चिरून सर्वांगावर वार करून हत्या केली. त्यानंतर स्वतःवरही वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनेची माहिती म्हारळ पोलीस चौकीचे प्रमुख दत्तात्रय नलावडे यांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या पती पत्नीला उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान पत्नी विद्या हिचा मृत्यू झाला, तर संतोषची प्रकृती चिंताजनक असून पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले. तर पत्नीचा मृतदेह उत्तर तपासणीसाठी जे जे रुग्णालयात पाठविल्याची माहिती मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली. या घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी करीत आहेत.