आधारवाडी डम्पिंग कसे बंद करायचे?
By Admin | Updated: February 10, 2017 04:12 IST2017-02-10T04:12:14+5:302017-02-10T04:12:14+5:30
शहरातील आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्याबाबत होत असलेल्या दिरंगाईसाठी प्रशासनाला जबाबदार धरले जात असतानाच दुसरीकडे

आधारवाडी डम्पिंग कसे बंद करायचे?
कल्याण : शहरातील आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्याबाबत होत असलेल्या दिरंगाईसाठी प्रशासनाला जबाबदार धरले जात असतानाच दुसरीकडे यासंदर्भात मंजूर केलेला ठरावच स्थायी समितीने प्रशासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला नसल्याचे समोर आले आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस हे डम्पिंग शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याबाबतचा मंजूर केलेला ठराव तब्बल दोन महिने रोखून ठेवण्यामागे गौडबंगाल काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. तर, डम्पिंग बंद करण्याचे न्यायालयाला दिलेले आश्वासन पाहता तातडीने कृती केली असताना दुसरीकडे याबाबतचा मंजूर ठरावच न आल्याने कार्यवाही करायची तरी कशी, अशा पेचात केडीएमसी प्रशासन पडले आहे.
आधारवाडी डम्पिंगची कचरा साठवण्याची क्षमता संपली असतानाही तेथे घनकचरा व्यवस्थापनाची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नसल्याने उच्च न्यायालयाने महापालिका क्षेत्रात नव्या बांधकामांना बंदी घातली होती. त्यानंतरही हे डम्पिंग बंद करण्याबाबत ठोस कृती झालेली नाही. २०१३-१४ पासून एकूण नऊ वेळा निविदा मागवल्या. सुरुवातीला त्याला योग्य प्रतिसाद मिळाला नव्हता. फेब्रुवारीत निविदेला प्रतिसाद मिळाला. त्याला मान्यताही देण्यात आली होती. परंतु, संबंधित कंत्राटदाराकडून सहा महिने उलटूनही ठोस अशी कार्यवाही झाली नाही. त्यातच, त्याने काम करण्यास असमर्थता दर्शवल्याने कचरा डम्पिंगची समस्या जैसे थे राहिली.
दरम्यान, पुन्हा प्रशासनाने काढलेल्या निविदा प्रक्रियेला उशिरा का होईना प्रतिसाद मिळाला. सौराष्ट्र एनव्हायरो प्रोजेक्ट प्रा.लि. कंपनीची निविदा प्रशासनाने मान्य केली. २९ कोटी ५३ लाखांच्या या प्रस्तावाला ३० नोव्हेंबरच्या स्थायी समितीच्या सभेत मान्यताही देण्यात आली. संबंधित कंत्राटदाराने कामाचे आदेश मिळाल्यापासून ३६ महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच तीन वर्षांत आधारवाडी येथील सध्याच्या डम्पिंग परिसरातील जमा असलेल्या कचऱ्याचे बायो रिमेडिएशन करून कचऱ्याने व्यापलेल्या क्षेत्रापैकी कमीतकमी १९ हजार ४०० चौरस मीटर जागा मोकळी करणे व डम्पिंग शास्त्रोक्त पद्धतीने कायमस्वरूपी बंद करावयाचे आहे.
एकीकडे आधारवाडी डम्पिंग बंद करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली, तर दुसरीकडे मांडा येथे घनकचऱ्यासाठी सुनियोजित लॅण्डफीलसाठी आराखडा तयार करणे, बांधकाम करणे त्याचबरोबर ३ वर्षांच्या कालावधीसाठी दैनंदिन देखभाल दुरुस्ती करणे, या शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावणे, या भरावभूमी प्रकल्पालाही स्थायीने मंजुरी दिली आहे. (प्रतिनिधी)
१७ गावांचा कचरा टाकायचा कुठे ?
डोंबिवली : केडीएमसीत समावेश झालेल्या २७ गावांपैकी १७ गावांचा कचरा पूर्वेतील स्टार कॉलनीजवळील एका भूखंडावर टाकला जात आहे. त्यास इमारतींमधील रहिवाशांचा विरोध आहे. त्यामुळे कचरा टाकण्यासाठी स्वच्छता विभागातील अधिकाऱ्यांनी तेथेच दुसरी जागा पाहिली असून त्यालाही रहिवाशांनी गुरुवारी कडाडून विरोध केला.
केडीएमसीच्या घंटागाड्यांद्वारे गावांमधील गोळा केलेला कचरा स्टार कॉलनीतील भूखंडावर एकत्र केला जातो. तेथे कचऱ्यातील प्लास्टिक वेगळे केले जाते. त्यानंतर, दुपारपर्यंत एक ट्रक आणि जेसीबीद्वारे हा कचरा कल्याणला डम्पिंग ग्राउंडमध्ये नेला जातो. पण, या कामात वेळ लागतो. त्यामुळे अनेकदा कचरा तेथे साठल्याने परिसरातील रहिवाशांना त्याचा त्रास होतो. त्याला पर्याय म्हणून नजीकच्याच मोकळ्या भूखंडामध्ये कचरा गोळा करण्यासाठी स्वच्छता अधिकारी नरेंद्र धोत्रे यांनी जागेची पाहणी केली.
पण, त्यासही रहिवाशांनी विरोध केला. मात्र, हा भूखंड नेमका कोणाचा आहे, तेथे कचरा टाकण्यास विरोध का झाला, हे कळू शकले नाही. कोणाचा रोष, राग नको, पण काम तर व्हायला हवे, यासाठी धोत्रे यांनी सध्या जेथे कचरा टाकला जात आहे, तेथेच त्याची तातडीने विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने त्यांनी कामही सुरू केले आहे.