शिंदेसेनेने पालघर, डहाणूत विजयश्री कशी खेचून आणली? वाडा-जव्हारमध्ये उद्धवसेनेच्या सत्तेला भाजपने लावला सुरूंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 09:39 IST2025-12-22T09:39:06+5:302025-12-22T09:39:25+5:30
भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर, जव्हार नगरपरिषद आणि वाडा नगरपंचायतीवर भाजपचाच झेंडा फडकणार असे जाहीर वक्तव्य करून स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याचे आव्हान शिंदेसेना आणि अजित पवार गट या महायुतीतील आपल्या घटक पक्षांना दिले होते.

शिंदेसेनेने पालघर, डहाणूत विजयश्री कशी खेचून आणली? वाडा-जव्हारमध्ये उद्धवसेनेच्या सत्तेला भाजपने लावला सुरूंग
- हितेन नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : महायुतीतील भाजप आणि शिंदेसेनेने पालघरमध्ये एकमेकांना आव्हान दिल्यावर पालघर, डहाणू, जव्हार नगरपरिषद आणि वाडा नगरपंचायतीच्या निवडणुका दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढवल्या. यात अतिशय चुरशीच्या झालेल्या पालघर नगर परिषदेत शिंदेसेनेने आपला बालेकिल्ला कायम राखला आहे. तर डहाणू नगर परिषदेत शिंदेसेनेसह महाविकास आघाडीतीलही अन्य सर्व पक्षांनी एकत्र येत भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा पराभव करीत शिंदेसेनेचा भगवा फडकावला. जव्हार नगर परिषदेसह आणि वाडा नगरपंचायत जिंकण्यात भाजपला यश मिळाले. या दोन्ही ठिकाणी उद्धवसेनेच्या असलेल्या सत्तेला भाजपने दणका दिला.
भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर, जव्हार नगरपरिषद आणि वाडा नगरपंचायतीवर भाजपचाच झेंडा फडकणार असे जाहीर वक्तव्य करून स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याचे आव्हान शिंदेसेना आणि अजित पवार गट या महायुतीतील आपल्या घटक पक्षांना दिले होते. भाजपने नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांची उमेदवारी जाहीर केल्यावर त्यांच्या विरोधात शिंदेसेनेने राजू माच्छी या माजी नगरसेवकाला उमेदवारी दिली आणि शिंदेसेना, अजित पवार गटासह महाविकास आघाडीतील काही घटक पक्षांनी एकत्र येत भरत राजपूत यांच्या पराभवाची रणनीती आखली होती.
डहाणूत प्रचार सभेसाठी आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘डहाणू मधील एकाधिकारशाही संपवून रावणाच्या अहंकाराचे दहन करण्याचे आवाहन मतदारांना केले होते. त्यांच्या या आवाहनाला डहाणूकरांनी प्रतिसाद दिला. भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचा शिंदेसेनेचे राजू माच्छी यांनी ४०६५ इतक्या मतांनी पराभव केला. मात्र भाजपाने २७ पैकी १७ जागा जिंकत डहाणू परिषदेत सर्वाधिक जागा घेतल्या.
जव्हार, वाडा येथे काय घडले?
जव्हार नगर परिषदेवर आणि वाडा नगरपंचायतीवर आधी उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व होते, मात्र त्यांच्या वर्चस्वाला धक्का देत भाजपने २० पैकी १४ जागा जिंकून एक हाती सत्ता मिळवली. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा उदावंत यांना ३८६५ मते मिळाली.