...तर लाडक्या बहिणींना मिळणार सवलतीत घर; काय आहे ऑफर? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 09:31 IST2025-01-31T09:31:19+5:302025-01-31T09:31:42+5:30
एमसीएचआय क्रेडाईचे ठाण्यात मालमत्ता प्रदर्शन.

...तर लाडक्या बहिणींना मिळणार सवलतीत घर; काय आहे ऑफर? जाणून घ्या...
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ‘एमसीएचआय क्रेडाई’ ठाणे यांच्यावतीने ठाण्यात आयोजित करण्यात येत असलेल्या मालमत्ता प्रदर्शनात ज्या महिला चार दिवसांत फ्लॅट बुकिंगची २० टक्के रक्कम भरतील, त्या बहिणींना फ्लॅट खरेदीत सवलत दिली जाणार असल्याची माहिती अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी गुरुवारी दिली. यंदाच्या प्रदर्शनात १०० हून अधिक गृहप्रकल्पांतील घरे विक्रीसाठी उपलब्ध असणार असून, यामध्ये ३० लाखांपासून ते तीन कोटींच्या किमतीची घरे उपलब्ध आहेत. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष राहुल वोरा, सचिन मिराणी, पदाधिकारी गौरव शर्मा, जय वोरा उपस्थित होते.
यंदाचे प्रदर्शन ७ ते १० फेब्रुवारी या कालावधीत ढोकाळी येथील हायलँड गार्डन मैदानावर भरविण्यात येणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. प्रदर्शनामुळे एकाच छताखाली ठाणे शहर आणि जिल्ह्यातील उत्तमोत्तम गृहप्रकल्पात घर घेण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध होईल. प्रदर्शनात मोफत प्रवेश दिला जाणार आहे.
१०० हून अधिक गृहप्रकल्पांचे स्टॉल
सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत प्रदर्शन खुले राहणार आहे. ठाणे पूर्व रेल्वे स्टेशनबाहेरील आनंद चित्रपटगृहापासून मोफत बससेवा, पूर्वनोंदणी केल्यास रांगेविना प्रवेश, मोफत पार्किंग, वॉलेट पार्किंगचाही पर्याय, ८० हून अधिक नामांकित बिल्डरांचे १०० हून अधिक गृहप्रकल्पांचे स्टॉल, १५ हून अधिक वित्तसंस्था, २५ हजारांहून अधिक घर खरेदीदारांची उपस्थिती, वातानुकूलित प्रशस्त मंडप, असे प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. याशिवाय, गृहसंकुलांसाठी स्पर्धा ठेवली जाणार असून त्यातील विजेत्यांना दीड लाखांपासून ते ७५ हजारांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
प्रदर्शनात ३१५ चौरस फुटांची छोटी, त्याहून मोठ्या आकाराची घरे उपलब्ध असतील. ३० लाखांपासून तीन कोटींच्या घरांचे पर्याय उपलब्ध असतील. कशेळी-काल्हेर भागातील काही घरेही प्रदर्शनात विक्रीसाठी असतील, असेही मेहता म्हणाले.