ठाण्यात रॅकेट चालविणाऱ्या हॉटेल मॅनेजरला अटक; दोन पीडित महिलांची सुटका

By जितेंद्र कालेकर | Updated: June 22, 2025 21:21 IST2025-06-22T21:21:06+5:302025-06-22T21:21:54+5:30

ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

hotel manager arrested for running racket in thane two female victims rescued | ठाण्यात रॅकेट चालविणाऱ्या हॉटेल मॅनेजरला अटक; दोन पीडित महिलांची सुटका

ठाण्यात रॅकेट चालविणाऱ्या हॉटेल मॅनेजरला अटक; दोन पीडित महिलांची सुटका

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली काही मुलींच्या मार्फत सेक्स रॅकेट चालविणाऱ्या हॉटेल मॅनेजर अंकितकुमार यादव (२५) याला अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी रविवारी दिली. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यातील वंदना सिनेमा कम्पाउंड वंदना एसटी बस स्टॅडसमोरील जुना आग्रा रोड भागातील हॉटेल शिव वंदना इन लॉजिंग ॲन्ड बोर्डिंग येथे काही तरुणींकडून ऑनलाइन एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली गुगलवर जाहिरात देऊन पैशाच्या आमिषाने मुलींच्या मार्फत सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळाली होती. यातील मुलींचे फोटो ग्राहकांना तसेच ते एस्कॉट सर्व्हिससाठी पाठविले जात असल्याचीही माहिती समोर आली.

त्याच माहितीच्या आधारे चौधरी यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक स्नेहल शिंदे, जमादार डी. के. वालगुडे, हवालदार व्ही. आर. पाटील, आर. यू. सुवारे आणि के. बी. पाटील यांच्या पथकाने २० जून रोजी या हॉटेलवर एका बनावट गिऱ्हाइकाच्या मदतीने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास छापा टाकला. याच छाप्यात देहविक्रीसाठी आणलेल्या दोन मुलींची सुटका केली. एका मुलीमागे पाच हजार रुपये घेतले जात होते. यातील काही रक्कम ही मुलींना तर काही रक्कम दलाल स्वत:कडे आणि हॉटेलसाठी ठेवून हे सेक्स रॅकेट चालवीत असल्याचेही उघड झाले. यामध्ये दोघे जण फरार असून त्यांचाही शोध घेण्यात येत आहे.

गुगलवर दिला होता एस्कॉर्ट सर्व्हिसचा क्रमांक

यादव आणि त्याच्या साथीदारांनी गुगलवर ठाण्यात मुलींच्या एस्कॉर्ट सर्व्हिससाठी काही क्रमांक दिले होते. त्याच आधारे पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केल्याचे निरीक्षक चौधरी यांनी सांगितले.

Web Title: hotel manager arrested for running racket in thane two female victims rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.