मोठी बातमी: ‘म्हाडा’तर्फे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल; नवे धोरण आणले जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 05:45 IST2025-01-30T05:45:01+5:302025-01-30T05:45:18+5:30
म्हाडाच्या माध्यमातून बुधवारी ३६६२ जणांना घरे मिळाली, परंतु ही घरे मिळावी यासाठी ९३ हजार ६६२ अर्ज आले होते. ७१ हजारांहून अधिक जणांनी प्रक्रिया पूर्ण केली होती.

मोठी बातमी: ‘म्हाडा’तर्फे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल; नवे धोरण आणले जाणार
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : म्हाडाच्या घरांवर लोकांचा विश्वास वाढल्यामुळेच म्हाडाचे नवे धोरण आणले जात आहे. या धोरणानुसार सर्वसामान्यांना परडवणारी घरे, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल उभारणी केली जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिली. त्या माध्यमातून लोकांना हक्काचे घर उपलब्ध होणार आहे.
ठाण्यात पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ संगणकीय सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात शिंदे यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. शिंदे म्हणाले की, ज्यांना घरे मिळणार आहेत, त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. सरकार म्हणूनही आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. घर घेणे प्रत्येकाचे स्वप्न असते. महागडी घरे घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही, त्यामुळे म्हाडाच्या माध्यमातून बुधवारी ३६६२ जणांना घरे मिळाली, परंतु ही घरे मिळावी यासाठी ९३ हजार ६६२ अर्ज आले होते. ७१ हजारांहून अधिक जणांनी प्रक्रिया पूर्ण केली होती.
पारदर्शक सोडत
म्हाडाच्या लॉटरी पद्धतीत अतिशय पारदर्शकता आहे, अर्ज भरण्यापासून घर देईपर्यंत ऑनलाइन काम केले जाते. यात ब्रोकर किंवा इतर कुणी घर मिळवून देण्याचे आमिष दाखवत असेल तर ते खोटे आहे.
सर्वसामान्यांच्या गृह स्वप्नपूर्तीसाठी शासन कटिबद्ध आहे. येत्या दोन वर्षांत म्हाडाच्या माध्यमातून राज्यात सुमारे एक लाख घरांच्या उभारणीसाठी प्रयत्न केले जात आहेत. या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्याचे गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल.
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री
मुंबईत प्रत्येकाला घर
गेल्या दीड वर्षात १३ सोडती काढून १३ हजार घरे देण्यात आली. म्हाडाच्या घरांवर लोकांचा विश्वास वाढल्यानेच म्हाडाचे नवे धोरण लवकरच आणले जात आहे. रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पावले उचलली आहेत. म्हाडा, एसआरएचे प्रकल्प मार्गी लावले जाणार आहेत. चेंबूरला १७ हजार घरांचा प्रकल्प एसआरए आणि एमएमआरडीच्या माध्यमातून पूर्ण केला जात आहे. झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्यासाठी प्रयत्न आहे. प्रत्येकाला मुंबईत घर मिळावे यासाठी प्रयत्न आहे. आशियातील सर्वात मोठ्या क्लस्टरला ठाण्यात मान्यता दिली आहे. ठाण्यात चार ते पाच ठिकाणी क्लस्टरचे काम सुरू असल्याचेही ते म्हणाले.