किसान ॲपचे वरातीमागून घोडे ; वादळ-वारे येऊन गेल्यानंतर अलर्ट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:40 IST2021-05-26T04:40:05+5:302021-05-26T04:40:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणो : तौक्ते चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीची माहिती शेतकऱ्यांना काही काळ आधीच दिल्याचा दावा कृषी विभागाकडून केला ...

किसान ॲपचे वरातीमागून घोडे ; वादळ-वारे येऊन गेल्यानंतर अलर्ट !
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणो : तौक्ते चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीची माहिती शेतकऱ्यांना काही काळ आधीच दिल्याचा दावा कृषी विभागाकडून केला जात आहे. तरीही जिल्हाभरातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. तब्बल २३८ हेक्टरवरील कृषी संपत्ती या वादळामुळे उद्ध्वस्त झाली. त्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. किसान ॲपचे वरातीमागून घोडे या म्हणीप्रमाणे वादळाची ऑनलाईन माहिती मोबाईलवर उशिरा मिळाल्याचा दावाही शेतकऱ्यांनी केला आहे.
शेतकऱ्यांना आपत्तीसह त्यांना उपयुक्त अशी माहिती देण्यासाठी जिल्हाभरात कृषीच्या क्षेत्रिय पातळीवरील कर्मचाऱ्यांच्या व्हॉटसॲप ग्रुपवर प्रत्येक तालुक्यांचे ग्रुप तयार केलेले आहेत. त्याद्वारे इत्थंभूत माहिती शेतकऱ्यांना आधीच देऊन अलर्ट केले जाते. शेतकऱ्यांच्या योजनांची माहितीही या ग्रुपवर दिली जाते. वर्षभरात दीड लाखांच्या जवळपास एसएमएस शेतकऱ्यांना वेळच्या वेळी दिले जात असल्याचा दावा जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकार अंकुश माने यांनी केला. या माहितीचा लाभ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील गट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
ताैक्ते चक्रीवादळाचा फटका बसून जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. यात घरांच्या नुकसानीसह शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यासह आंबा, रोपवाटिका आदींचे नुकसान झाले आहेत. झाडे उन्मळून पडली आहेत. यादरम्यान ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क अभावी बहुतांशी शेतकऱ्यांना माहिती मिळण्यास विलंब झाल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. या चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील तिघांच्या मृत्यूसह आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. ५६६ घरांचे नुकसान झाले असून २३८ हेक्टरवरील आंबा, काजू, भात आणि भाजीपाल्याचे नुकसान होऊन तब्बल १६४ गावांना चक्रीवादळाचा फटका बसला आहे. चक्रीवादळामुळे जिल्ह्यात पावसासह वादळी वारा ताशी ९० ते १०० किमी वेगाने वाहत होता. जिल्ह्यातील २३८ हेक्टरवरील आंबा-काजूसह रोपवाटिकांचे मुरबाड, भिवंडी व शहापूर तालुक्यात नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील १६४ गावांमधील २३८.१० हेक्टरवरील आंब्यासह काजू, केळी, उन्हाळी भात आणि भाजीपाल्याचे नुकसान या अवकाळी पावसाने झाले आहे. जिल्ह्यातील ५८२ शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागले. या शेतकऱ्यांचे शेडनेट फाटले, पॉलिनेट तुटले, घरावरील पत्रेही उडाली. जिल्ह्यातील रोपवाटिकांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुरबाडमधील रोपवाटिकांच्या ३ हजार २०० रोपांचे नुकसान झाले. भिवंडी तालुक्यातील चाविंद्रा येथील रोपवाटिकेतील ४ हजार ४५० रोपांची वाट या वादळाने लावली आहे. यामध्ये आंब्यांच्या कलमांसह काजू, बदाम, जांभूळ, सीताफळ, सांग, शेवगा आदी रोपांच्या नुकसानीचा फटका वाटिकांना बसला आहे.
.........