सरपंच-उपसरपंचांना मानधन; सदस्यांना मात्र केवळ चहापान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 23:19 IST2021-02-21T23:19:54+5:302021-02-21T23:19:59+5:30
राज्य शासनाकडे लवकरच व्यक्त करणार नाराजी

सरपंच-उपसरपंचांना मानधन; सदस्यांना मात्र केवळ चहापान
सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्ह्यातील १५८ पैकी १५३ ग्रामपंचायतींच्या १४७२ सदस्यांसाठी निवडणूक होऊन ते विजयी झाले. या निवडणूक रिंगणातील दोन हजार ४१३ उमेदवारांमधून निवडून आलेल्या या सदस्यांपैकी सरपंच आाणि उपसरपंच यांनाच मानधन दिले जाते. मात्र, उर्वरित सदस्यांना ते दिले जात नसल्यामुळे त्यांच्यातील नाराजी लवकरच राज्य शासनाच्या दरबारी ऐकविली जाणार आहे.
जिल्ह्यातील ४७९ मतदान केंद्रांवर गावपाड्यातील दोन लाख ५० हजार ५०० मतदार या एक हजार ७२ सदस्यांना निवडून दिले आहे. त्यासाठी घेतलेले परिश्रम आणि इतरांची ओढवून घेतलेली नाराजी या सदस्यांना काही वर्षे तरी शांत बसू देणार नाही. असे असूनही या विजयी उमेदवारांना मानधनाची तजवीज शासनाकडून अद्यापही झाली नसल्यामुळे त्यांच्यातील असंतोष लवकरच मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचण्याची शक्यता आहे. या सदस्यांच्या निवडणुकीसाठी दोन हजार ९०० हून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ आणि तीन हजार पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात होते.
जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम भागातील गावपाडे, खेड्यांचा विकास साधणाऱ्या भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर तालुक्यांतील १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक एक महिन्यांपूर्वी म्हणजे १५ जानेवारीला झाली. एप्रिल ते डिसेंबर कालावधीत मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतीच्या एक हजार ४७२ सदस्यांसाठी या निवडणुका झाल्या आहेत. त्यासाठी चार हजार ३८ जणांनी उमेदवारी दाखल केली होती. यापैकी आठ ग्रामपंचायतींसह ४१८ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर उर्वरित ९९४ सदस्यांसाठी मतदान झाले होते.
जिल्ह्यातील १५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या; पण यातील ठाणे तालुक्यातील नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या १४ गावांच्या पाच ग्रामपंचायतींसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. या ग्रामपंचायतींच्या ५१ सदस्यांसाठी ही निवडणूक होणार होती; पण उमेदवारीअभावी पाच ग्रामपंचायतींमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडली नाही.