पत्नीच्या मदतीने केला महिलेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:21 IST2018-11-27T00:21:52+5:302018-11-27T00:21:59+5:30
नोकरीचे आमिष दाखवून पश्चिम बंगाल येथून आणलेल्या एका महिलेवर नेरूळ येथे अत्याचार केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.

पत्नीच्या मदतीने केला महिलेवर अत्याचार
डोंबिवली : नोकरीचे आमिष दाखवून पश्चिम बंगाल येथून आणलेल्या एका महिलेवर नेरूळ येथे अत्याचार केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या प्रकरणातील आरोपी हा पीडित महिलेचा नातलग असून तिच्यावर अत्याचार करण्यासाठी आरोपीला त्याच्या पत्नीनेच मदत केल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.
पश्चिम बंगालमधील आगरहाटी येथील ३३ वर्षीय पीडित महिलेचा नातलग हसनूर हनीफ मंडल हा नवी मुंबईतील नेरूळ येथील धारावे गावात राहतो. तो आणि त्याची पत्नी मुस्लिमाबी हसनूर मंडल यांनी पीडित महिलेस कामधंद्याचे आमिष दाखवून गेल्या आठवड्यात स्वत:च्या गावी आणले. चार दिवस ती आरोपी दाम्पत्याच्या घरी राहिली. रविवारी रात्री हसनूरने तिच्यावर दोनवेळा अत्याचार केला. तिने आरडाओरड करू नये, यासाठी हसनूरच्या पत्नीने पीडित महिलेचे हात धरून ठेवले. तुला यापुढे अशाच प्रकारे देहविक्रीचा व्यवसाय करायचा आहे, तरच तुला पैसे मिळतील, असे हसनूरच्या पत्नीने तिला बजावले. पीडित महिलेने नकार दिला असता तिला दोघांनी मारहाण केली.
या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडित महिलेने सोमवारी घरातून पळ काढला. तिने रेल्वेमार्गे आधी ठाणे आणि नंतर कल्याण रेल्वेस्थानक गाठले. तेथे ती रडत असताना सहमहिला प्रवाशांनी विचारपूस केली. त्यावेळी पीडित महिलेने घडलेली घटना त्यांना सांगितली. त्यानुसार, महिलांनी पीडितेला कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात नेऊन सोडले. पीडित महिलेस केवळ बंगाली भाषा येत असल्याने पोलीस निरीक्षक सुरेखा मेढे यांनी दुभाषकाकडून तिची व्यथा जाणून घेतली. ही घटना नेरूळ पोलीस ठाण्यांतर्गतची असल्याने हे प्रकरण नवी मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.