भिवंडी - अवजड वाहनांना ठरावीक वेळेत बंदी असतानाही गोदामांमध्ये जाणाऱ्या अवजड वाहनांना चालकांकडून ३०० रुपये घेऊन प्रवेश दिला जात असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
वाहतूककोंडीत अडकलेले ॲड. भारद्वाज चौधरी यांनी फेसबुक लाइव्ह करत वाहतूक पोलिसांच्या या अजब कारभाराचा भंडाफोड केला आहे. खुद्द ट्रकचालकानेच याबाबतची माहिती दिली असून, या घटनेमुळे भिवंडीतील वाहतूककोंडीला वाहतूक पोलिसांची हप्तेखोरीच जबाबदार असल्याचे धक्कादायक वास्तव या व्हिडीओवरून समोर आले आहे.
याआधीही हप्ताखोरीचा झाला होता भंडाफोडमागील महिन्यात मानकोली नाक्यावर वाहतूक पोलिसांच्या हप्तेखोरीचा भंडाफोड सोशल मीडियावर केला होता, तेव्हा काही काळ वाहतूककोंडी कमी झाली होती. मात्र, आता पुन्हा वाहतूक पोलिसांची हप्तेखोरी समोर आली असून, भिवंडीतील वाहतूककोंडीचा प्रश्न सोडविण्यात वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त सपशेल अपयशी ठरल्याचे उघड झाले आहे. सरकारने भिवंडीतील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी त्रयस्थ यंत्रणा, संस्था अथवा अनुभवी पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे, अशी प्रतिक्रिया ॲड. चौधरी यांनी दिली आहे.
प्रचंड वाहतूककोंडीअवजड वाहनांमुळे अंजूर फाटा, काल्हेर कशेळी ते ठाणे तसेच अंजूर फाटा, वळगाव दापोडे, मानकोली तसेच पिंपळास ते खारेगाव पुलापर्यंत प्रचंड वाहतूककोंडी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भिवंडीत अवजड वाहनांना बंदी केली होती.
चौकशी करून कारवाईया व्हिडीओची यंत्रणेने दखल घेतली असून, यासंदर्भात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली आहे.