Heavy rains disrupt life | मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

ठाणे : मुसळधार पावसामुळे ठाणे, मुंबईतील जनजीवन मंगळवारी विस्कळीत झाले. पावसाचे पाणी रस्त्यावर साचून घोडबंदर रोडसह ठिकठिकाणची वाहतूक मंदावली होती. ओवळा परिसरात तुंबलेल्या पाण्यात वीज प्रवाहित होऊन १५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.

ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी दिवसभर अधूनमधून पाऊस हजेरी लावतच होता. घोडबंदर रोडवर सकाळी ठिकठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे ठाण्याहून भार्इंदर, बोरीवली तसेच अहमदाबादकडे जाणारी वाहतूकही बराच वेळ मंदावली होती. काही वेळ पावसाने विश्रांती घेताच पाण्याचा निचरा होऊन वाहतूक सुरळीत झाली. मात्र तोपर्यंत घोडबंदर रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहरातील वागळे इस्टेट, पाचपाखाडी, मुलुंड चेक नाका, घोडबंदर रोड, कळवा, मनीषानगर, कापूरबावडी आदी ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यामुळे ठाणेकरांचे हाल झाले. सायंकाळनंतर पावसाने पुन्हा जोर धरला होता.

दरम्यान, ओवळा येथील हनुमान मंदिराजवळ विजेची भूमिगत तार क्षतीग्रस्त झाली आहे. पावसामुळे या ठिकाणी पाणी तुंबले असता त्यात वीज प्रवाहित झाली. त्यामुळे विजेचा धक्का लागून रकीब आशापुरम मंडल (१५) याचा जागीच मृत्यू झाला. वर्तकनगर येथील सृष्टी नावाच्या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग निखळला. कोपरी येथे उभ्या कारवर झाड पडले. ठाण्यात आणखी तीन ठिकाणी झाडे कोसळली.

पाणलोट क्षेत्रात जोर कमी
च्जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी आहे. त्यामुळे धरणांचा पाणीसाठा कमी झाला आहे. भातसा धरणात केवळ ८ मिमी पाऊस पडला. बारवीत ११, मोडकसागरमध्ये सात, तानसात पाच आणि आंध्रा धरणात १९ मिमी पाऊस पडला.
च्या धरणांच्या शहापूर व मुरबाड तालुक्यात प्रत्येकी अवघा ४ मिमी पाऊस पडला आहे. भिवंडी ७३ मिमी, अंबरनाथला ७२ मिमी, उल्हासनगरला ५६, तर कल्याणला ५१ मिमी पाऊस पडला. जिल्ह्यात सरासरी अवघा ८५ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. ठाणे शहर व तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक १00 मिमी. पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.
 

Web Title: Heavy rains disrupt life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.