सुनील घरत, लोकमत न्यूज नेटवर्क, पारोळ : होळी दहन करून घरी येत असताना दुचाकी अपघातात मामा व भाचा यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पारोळ येथे शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास हा अपघात घडला. प्रल्हाद माळी (वय २५, रा. भिणार) व त्यांचा भाचा मनोज जोगारी (वय २०, रा. वरठापाडा, भिणार) अशी या मृत मामा-भाचे यांची नावे आहेत. हे होघेही एकाच गावातील असल्याने भिणार गावात होळीच्या उत्सवात शोककळा पसरली आहे.
प्रल्हाद व मनोज दोघे होळी दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी ढेकाले येथे गेले होते. ते दुचाकीवरून परत येत असताना मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ढेकाले गावाजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटून संरक्षक भिंतीला दुचाकीची जोरदार धडक बसली. या धडकेत या दोघांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
दरम्यान, या घटनेची नोंद मांडवी पोलिस ठाण्यात झाली असून या अपघाताचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.