तो इथेच शेतात लपला होता! सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याबाबत समोर आली धक्कादायक माहिती
By जितेंद्र कालेकर | Updated: January 20, 2025 11:11 IST2025-01-20T11:11:05+5:302025-01-20T11:11:54+5:30
Saif Ali Khan Attack News: एकीकडे मुंबई पाेलिसांचे पथक ठाण्याच्या कासारवडवली पाेलिसांच्या मदतीने अभिनेता सैफ अली खानच्या हल्लेखाेराचा शाेध घेत हाेते. त्याचवेळी हल्लेखाेर मात्र हिरानंदानी इस्टेटमधील मेट्राे रेल्वे प्रकल्प मजुरांच्या काॅलनीमागील वांग्याच्या शेतात लपला हाेता.

तो इथेच शेतात लपला होता! सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याबाबत समोर आली धक्कादायक माहिती
- जितेंद्र कालेकर
ठाणे - एकीकडे मुंबई पाेलिसांचे पथक ठाण्याच्या कासारवडवली पाेलिसांच्या मदतीने अभिनेता सैफ अली खानच्या हल्लेखाेराचा शाेध घेत हाेते. त्याचवेळी हल्लेखाेर मात्र हिरानंदानी इस्टेटमधील मेट्राे रेल्वे प्रकल्प मजुरांच्या काॅलनीमागील वांग्याच्या शेतात लपला हाेता. आपणच पहाटे तीनच्या सुमारास आरोपी शरीफूल इस्लाम शहजादला जेरबंद करण्यात पाेलिसांना मदत केली, असा दावा शेतमालक माेनिष ऊर्फ माेनू मणेरा यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
हल्लेखाेराचे टाॅवर लाेकेशन ठाणे रेल्वे स्टेशनपासून आठ किलाेमीटरवर असलेल्या ठाण्याच्या हिरानंदानी इस्टेटजवळील मेट्राे प्रकल्प कामगारांच्या वसाहतीमध्ये दर्शवण्यात येत होते. त्यामुळेच शनिवारी सायंकाळी सातपासून ते रविवारी पहाटे तीनपर्यंत तो संपूर्ण परिसर मुंबई पाेलिसांनी पिंजून काढला. काॅलनीतील ४० ते ५० घरांमध्ये सर्च ऑपरेशनही राबवण्यात आले. एका घरात आठ ते दहा मजूर दाटीवाटीत राहतात. सर्वच घरांमध्ये मजुरांचे माेबाइल, आधार कार्डसह इतर कागदपत्रे पोलिसांनी तपासली. त्यांचाकडे कसून चाैकशी करण्यात आली, मात्र त्यांपैकी काेणालाही आरोपीबद्दल काहीही सांगता येईना.
आरोपी वांग्याची झुडूपे अंगावर घेऊन लपला होता. पाेलिसांना त्याच्या माेबाइलचे लाेकेशन मिळूनही तो हाती लागत नव्हता. झडुपांची हालचालीवरून तो तिथे लपला असल्याचा अंदाज मी बांधला.
- माेनिष ऊर्फ माेनू मणेरा, शेतमालक
मीच आरोपीवर झडप घातली
वांग्याच्या मळ्यात पोलिस पथक आरोपीचा शाेध घेत होते. मीही त्यांना मदत करीत होतो. वांग्याच्या झुडुपाआड लपलेल्या आरोपीवर मी झडप घातली, यावेळी मला किरकोळ जखम झाली. आरोपीने सैफ अली खानवर यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आपल्याला नंतर पाेलिसांकडून समजली, असा दावा मोनिष यांनी केला.
आमच्या साहेबांवर हल्ला केला आहे...
पोलिसांनी शोध मोहीम सुरू असतानाच आरोपीचे टाॅवर लाेकेशन मात्र मजुरांच्या वसाहतीच्या मागे असलेल्या दाट जंगलातील वांग्याच्या मळ्यात दाखवले जात हाेते. या शेताचे मालक माेनिष घरात स्वयंपाक करीत असतानाच मुंबई पाेलिसांचे पथक तेथे धडकले. पोलिसांनी चाैकशी सुरू करताच मोनिष यांनी हे आपलेच घर आणि शेत असल्याचे त्यांना सांगितले. आमच्या साहेबांवर एका चाेरट्याने हल्ला केल्याचे पाेलिसांनी त्यांना सांगितले आणि आरोपीचा फोटो दाखवला. त्यावर आरोपीला ओळखत नसल्याचे माेनिष यांनी पोलिसांना सांगितले.