‘त्या’ जलमित्राचा सावरकर पुरस्काराने सन्मान
By Admin | Updated: May 29, 2016 02:48 IST2016-05-29T02:48:33+5:302016-05-29T02:48:33+5:30
सध्या ठाणे शहरासह जिल्ह्यात पाणीटंचाई सुरू आहे. त्यामुळे पालिकांनी पाण्याची बचत करण्यासाठी विविध स्वरूपाच्या योजना हाती घेतल्या आहेत. परंतु, पालिका योजना राबवत असतानाच

‘त्या’ जलमित्राचा सावरकर पुरस्काराने सन्मान
ठाणे : सध्या ठाणे शहरासह जिल्ह्यात पाणीटंचाई सुरू आहे. त्यामुळे पालिकांनी पाण्याची बचत करण्यासाठी विविध स्वरूपाच्या योजना हाती घेतल्या आहेत. परंतु, पालिका योजना राबवत असतानाच प्रभाग क्र. २ चे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी आपल्या प्रभागातील चार विहिरींची साफसफाई करून त्यातील पाणी इतर वापरासाठी उपलब्ध करून दिले आहे. यामुळे येथील सुमारे २० हजार घरांना पाणीकपातीच्या काळातही या विहिरींतील पाण्याचा वापर होऊ लागला आहे. अशा या जलमित्राच्या कार्याची दखल ठाण्यातील वीर सावरकर प्रतिष्ठानने घेत त्यांना वीर सावरकर पुरस्काराने सन्मानित केले आहे.
सध्या ठाणे शहराला ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे, तर गळतीचे प्रमाण ४५ टक्कयांच्या आसपास आहे. धरणांची पातळी खालावल्याने सध्या पाण्याचा वापर जपून करा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
डुंबरे यांनी प्रत्येक विहिरीचे एक कनेक्शन जवळच असलेल्या सार्वजनिक शौचालयाला दिले आहे. यामुळे परिसरातील सुमारे २० हजारांहून अधिक रहिवाशांना २४ तास विहिरींचे पाणी उपलब्ध झाले आहे. याशिवाय, पाणीकपातीच्या काळात येथील रहिवासी पाण्याचा साठा करून ठेवत होते. परंतु, आता या पाण्यामुळे पाण्याचा साठा करण्याचीही गरज त्यांना भासत नाही. त्यांच्या याच कामाची दखल ठाण्यातील वीर सावरकर प्रतिष्ठानने घेतली असून शनिवारी त्यांचा वीर सावरकर पुरस्कार देऊन सन्मान केला.
१२८ विहिरींची सफाई
- शहरात आजघडीला ५५५ विहिरी असून त्यातील ३३९ वापरात आहेत, तर २१६ विहिरी वापरात नाहीत. पालिकेने आता शहरातील त्यांची सफाई मोहीम हाती घेतली असून आतापर्यंत १२८ विहिरींची सफाई केली आहे.
- पालिकेच्या निधीची वाट न बघता डुंबरे यांनी बायर इंडियाच्या मदतीने आझादनगर भागातील चार विहिरींची सफाई करून घेतली आहे. सफाई झाल्यावर आरसीसी टाक्या बसवून या प्रत्येक विहिरीवर नळ लावले आहेत.