फिश टँक दाखवतो सांगून अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ
By जितेंद्र कालेकर | Updated: February 20, 2023 22:06 IST2023-02-20T22:05:28+5:302023-02-20T22:06:06+5:30
विकृत आरोपीला अटक, मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी

फिश टँक दाखवतो सांगून अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : फिश टँक दाखविण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलाची लैंगिक छळवणूक करणाऱ्या ३० वर्षांच्या विकृत व्यक्तिला रविवारी अटक करण्यात आली आहे. त्याला २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
२२ ते २४ जानेवारी २०२३ या कालावधी सायंकाळी ५ ते ६:३० वाजता जवळच्या सोसायटीच्या आवारात खेळत असलेल्या ११ वर्षीय मुलाला आरोपीने फिश टँक दाखविण्याच्या बहाण्याने घरी नेले. त्यानंतर घराचा दरवाजा बंद करून बेडरूम आणि शौचालयात त्याला अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडले. या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास मारण्याची धमकीही त्याने दिली. त्यामुळे भेदरलेल्या या मुलाने घरात हा प्रकार सांगितला नाही. त्यानंतर हा प्रकार वारंवार घडल्याने १९ फेब्रुवारीला त्याने आईला याबाबत सांगितले.
त्याबाबत तक्रार देताच चितळसर पोलिस ठाण्यात अनैसर्गिक अत्याचार (३७७) आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वनिता पाटील यांच्या पथकाने आरोपीस अटक केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"