हमाल म्हणतात, ही तर प्रभूंची अवकृपा
By Admin | Updated: February 26, 2016 04:22 IST2016-02-26T04:22:14+5:302016-02-26T04:22:14+5:30
रेल्वेच्या सेवेतील बिल्लाधारी हमालांना विशिष्ट काळ हमाली केल्यावर गँगमनची बढती देण्याचा निर्णय घेतला असता किंवा सध्या गर्दुल्ल्यांच्या रूपाने शिरकाव केलेल्या ‘फालतू हमालां’चे

हमाल म्हणतात, ही तर प्रभूंची अवकृपा
- मुरलीधर भवार, कल्याण
रेल्वेच्या सेवेतील बिल्लाधारी हमालांना विशिष्ट काळ हमाली केल्यावर गँगमनची बढती देण्याचा निर्णय घेतला असता किंवा सध्या गर्दुल्ल्यांच्या रूपाने शिरकाव केलेल्या ‘फालतू हमालां’चे आक्रमण रोखले असते तर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे उपकार झाले असते, अशी भावना हमालांनी व्यक्त केली. हमालांना यापुढे ‘सहायक’ संबोधण्याचा निर्णय घेतल्याने आमच्या जीवनात काडीमात्र फरक होणार नाही, अशा शब्दांत हमालांनी नाराजी व्यक्त केली.
कल्याण रेल्वे फलाटावर हमाली करणारा शरद आव्हाड हा तरुण बी.ए. उत्तीर्ण असून मूळचा नाशिकचा आहे. हमालीचे काम सुरू केले तेव्हा शरदला वाटले की, पुढेमागे बढती मिळेल. त्यामुळे शरदने प्रभू यांचा रेल्वे अर्थसंकल्प हमालांच्या तोंडाला पाने पुसणारा आहे, असे सांगितले. शरद २०१० पासून हमाली करीत आहे. हमालीचा बिल्ला आणि लाल शर्ट रेल्वे प्रशासन देते. त्याच्या नूतनीकरणासाठी दोन वर्षांनी ७० रुपये भरावे लागतात. लाल शर्ट वर्षातून एकदाच पुरवला जातो, अशी कैफियत शरदने मांडली
हमाल नामदेव कावरे यांनी सांगितले की, कल्याण स्थानकात अधिकृत हमाल ३० आहेत, तर ‘फालतू हमालां’ची संख्या ३०० पेक्षा जास्त आहे. फालतू हमाल म्हणजे बेकायदेशीर हमालीचा व्यवसाय करणारे गर्दुल्ले आहेत. ते बिल्लाधारी हमालांवर दादागिरी करतात. आमची रोजीरोटी व हमाली हिसकावून घेतात. त्यांच्यापासून प्रवाशांनाही धोका आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाकडून काणाडोळा केला जातो.
विलास सानप, विलास सांगळे, चंद्रभान सानप आणि कचरू आव्हाड यांनी सांगितले की, आमची प्रमुख मागणी आम्हाला डी क्लास अर्थात गँगमनची बढती मिळावी, ही होती. ही मागणी रेल्वेमंत्र्यांनी मान्य केलेली नाही. आता पहिल्यासारखा हमालीचा व्यवसाय राहिलेला नाही. पोटापाण्याचा प्रश्न सुटत नाही. जे हमाल थकले आहेत, त्यांच्या वारसांना रेल्वेत नोकरी मिळावी. हमालांना पेन्शन योजना लागू करावी. तसेच त्यांच्या आरोग्याचा विमा असावा. हमालांच्या मुलांना रेल्वेच्या शाळेत प्रवेश मिळावा. हमालांसाठी विश्रामगृह असावे. जे शारीरिकदृष्ट्या सक्षम नाहीत, त्या हमालांना त्यांचा हमालीचा परवाना अनेक वेळा हस्तांतरित करता यावा, आदी प्रमुख मागण्या होत्या. २० जानेवारीला आंदोलन केले होेते.
कल्याण स्थानकात पूर्वी १७५ हमाल काम करीत होते. लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना त्यांनी कल्याण स्थानकातील १४५ हमालांना गँगमनची बढती मिळाली. उर्वरित ३० हमालांना बढतीच मिळाली नाही. बढतीबद्दल सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. सध्या कल्याण स्थानकात केवळ ३० हमाल उरले आहेत. वर्षभरातून दोन महिन्यांचा प्रवासी पास हमालांना मिळतो. हमालीतून दिवसाला जेमतेम ४०० ते ५०० रुपये मिळतात. कधीकधी हमाली मिळत नाही.